05 April 2020

News Flash

Pro Kabaddi Season 6 : बेंगळूरु बुल्स प्रथमच अंतिम फेरीत

कोची येथील राजीव गांधी बंदिस्त स्टेडियमवरील ‘क्वालिफायर-१’चा सामना पहिल्या सत्रात विलक्षण रंगतदार ठरला

पवन शेरावतच्या चढायांमुळे गुजरातला पराभवाचा धक्का

प्रो कबड्डी लीग

क्रीडा प्रतिनिधी, कोची : पवन शेरावतच्या दोन अफलातून अव्वल चढाया आणि संघनायक रोहित कुमारची अष्टपैलू चमक या बळावर बेंगळूरु बुल्सने गतउपविजेत्या गुजरात फॉच्र्युनजायंट्सचा ४१-२९ असा पाडाव करून प्रथमच प्रो कबड्डी लीगच्या अंतिम फेरीत धडक मारली.

कोची येथील राजीव गांधी बंदिस्त स्टेडियमवरील ‘क्वालिफायर-१’चा सामना पहिल्या सत्रात विलक्षण रंगतदार ठरला. दुसऱ्या सत्रात ३२व्या मिनिटाला गुजरातने बेंगळूरुवर पहिला लोण देत २५-२० अशी आघाडी मिळवली. त्यावेळी सामना बेंगळूरुच्या हातून निसटण्याची चिन्हे दिसत होती. मात्र पवनला ते नामंजूर होते. त्याने एका नेत्रदीपक चढाईत गुजरातच्या तीन जणांना बाद करीत दडपण आणले. मग के. प्रपंजनची पकड झाल्यावर पुढच्याच चढाईत पवनने पुन्हा तीन गुण मिळवले आणि ३५व्या मिनिटाला बेंगळूरुने गुजरातवर लोणची परतफेड केली. त्यामुळे बेंगळूरुने अनपेक्षितपणे २९-२६ अशी आघाडी घेतली. मग अखेरच्या पाच मिनिटांत चढाया आणि पकडी या दोन्ही विभागांत बेंगळूरुने वर्चस्व मिळवले. पवनने चढायांचे १३ गुण मिळवले, तर रोहितने चढायांचे सहा गुण मिळवून पाच सुरेख पकडीसुद्धा केल्या. गुजरातकडून सचिन तन्वरने दिमाखदार खेळ केला.

यूपी योद्धाने सोमवारी आणखी एका धक्कादायक विजयाची नोंद करीत दबंग दिल्लीचे आव्हान ४५-३३ अशा फरकाने आरामात संपुष्टात आणले. साखळीच्या अखेरच्या सामन्यातील विजयासह बाद फेरीत स्थान मिळवणाऱ्या यूपी योद्धाने रविवारी यू मुंबाच्या वाटचालीपुढे पूर्णविराम देत सर्वाचे लक्ष वेधले होते. प्रशांत कुमार राय (१३ गुण), रिशांक देवाडिगा आणि श्रीकांत जाधव यांच्या चढायांनी यूपीचा विजय सुकर केला.

पहिल्या सत्रात नवख्या खेळाडूंना पाठवण्याची रणनीती यशस्वी ठरली. पवन बेंगळूरुच्या विजयाचा शिल्पकार ठरला. मात्र रोहितने कुशलतेने केलेल्या पाच पकडी या यशात महत्त्वाच्या आहेत.

-रणधीर सिंह, बेंगळूरुचे बुल्सचे प्रशिक्षक

हार-जीत हा खेळाचा अविभाज्य भाग असतो. गुजरातने साखळीत २२ पैकी फक्त तीन लढती गमावल्या आहेत. तीन महिने सातत्यपूर्ण कामगिरी करणारा गुजरातचा संघ यंदा पुन्हा अंतिम सामना खेळेल.

-मनप्रीत सिंग, गुजरात फॉच्र्युनजायंट्सचे प्रशिक्षक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2019 3:11 am

Web Title: bengaluru bulls in the final of pro kabaddi league
Next Stories
1 Pro Kabaddi Season 6 : यू मुम्बाचं आव्हान संपुष्टात ! यूपी योद्धाची सामन्यात बाजी
2 Pro Kabaddi Season 6 :यूपीचे चक्रव्यूह भेदण्याचे सिद्धार्थपुढे आव्हान
3 प्रो कबड्डी लीग : गुजरातच्या विजयामुळे पाटणावर बाद फेरीची टांगती तलवार
Just Now!
X