वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या तसेच नियमभंगाचा कोणताही दंड प्रलंबित नसलेल्या शहरातील १५ हजार वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडून आभार कुपन भेट देण्यात आले आहे. या योजनेसाठी वाहतूक पोलिसांनी खास अ‍ॅप तयार केले असून शहरातील नामवंत उपाहारगृहचालक, मिठाई विक्रेते, घरपोच खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणारी अ‍ॅप आधारित सेवा अशा एकूण मिळून १५० जणांनी पोलिसांच्या योजनेला सहकार्य केले आहे.

वाहतूक पोलिसांकडून दीड महिन्यापूर्वी नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘आभार योजना’ सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना शहरातील विविध उपाहारगृहे, घरपोच अन्नपदार्थ उपलब्ध करून देणारी अ‍ॅप आधारित सेवा तसेच मिठाई उत्पादकांकडून क रण्यात आलेल्या खरेदीवर दहा टक्के सूट देणारे कुपन भेट देण्यास सुरूवात झाली आहे. वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांकडून विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात येते. कारवाईच्या वेळी दुचाकीस्वार तसेच मोटारचालकाने नियमांचे पालन केल्याचे दिसून आल्यास तसेच त्याच्याकडे वाहनपरवाना असल्यास त्याला आभार योजनेअंतर्गत कुपन देण्यास सुरूवात झाली आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात येत आहे. येरवडा वाहतूक शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे या योजनेचे समन्वयक आहेत.

कारवाईच्या वेळी एखाद्या दुचाकीस्वाराने हेल्मेट परिधान केल्याचे किंवा मोटारचालकाने आसनपट्टा (सीटबेल्ट) लावल्याचे दिसून येते. संबंधित वाहनचालकाकडे परवाना असल्यास तसेच त्याच्याकडे दंडाची रक्कम प्रलंबित नसल्यास त्याला कुपन भेट देण्यात येते. गेल्या दोन महिन्यात शहरातील नियम पाळणाऱ्या १५ हजार १२ जणांना आभार कुपन भेट देण्यात आले आहे. नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साठे यांनी नमूद केले.

आभार योजनेचे कुपन असे मिळते

या योजनेसाठी वाहतूक पोलिसांनी खास अ‍ॅप तयार केले आहे. या  योजनेत शहरातील १५० हून अधिक नामवंत व्यावसायिक, महादुकानातील (मॉल) व्यावसायिक सहभागी झाले आहेत. वाहनचालकाने नियमांचे पालन केल्याचे दिसून आल्यास त्याला एक क्रमांक अ‍ॅपद्वारे पाठविण्यात येतो. त्याच्या मोबाइलवर तो क्रमांक आल्यानंतर वाहनचालक वाहतूक पोलिसांच्या यादीतील ज्या व्यावसायिकाकडून खरेदी करेल, त्या खरेदीवर त्याला दहा टक्के सूट मिळते. कुपन भेट देण्यात आल्यानंतर साधारणपणे एक महिन्याच्या कालावधीत वाहनचालकाने खरेदी करणे आवश्यक आहे.