चतु:शृंगी व निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बुधवारी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये चोरटय़ांनी सुमारे पाच तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसका मारून तोडून नेले.
चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाषाण येथे अभिमान सोसायटीजवळ घडलेल्या घटनेबाबत विमल विजय भटेवरा (वय ६२, रा. अभिमान सोसायटी, पाषाण) यांनी फिर्याद दिली आहे. भटेवरा या मैत्रिणीसोबत सोसायटीजवळच्या रस्त्यावर सकाळी आठच्या सुमारास गप्पा मारत होत्या. त्या वेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरटय़ांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसका देऊन तोडले.
निगडी येथील घटनेबाबत मिना लुधीर काजळे (वय ५२, रा. शुभंकरोती प्लॉट क्र १८१, निगडी प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली आहे. काजळे या सकाळी पतीसमवेत सकाळची फेरी मारण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. निगडी प्राधिकरणातील काचघर चौकाजवळ मोटारसायकलवर बसलेले चोन चोरटे समोरच्या दिशेने आले. त्यातील एकाने त्यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसका देऊन तोडले.