पुणे, पिंपरी-चिंचवडमधील शाळांमध्ये पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या पहिल्या फेरीत ५ हजार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत प्रवेश मिळाला असून अद्याप अर्ज केलेले जवळपास १० हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.
शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांमध्ये वंचित आणि दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
पहिल्या फेरीमध्ये शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी शुक्रवार २० मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. पहिल्या फेरीत ८ हजार २३१ विद्यार्थ्यांना शाळा देण्यात आल्या आहेत. त्यातील ५ हजार १५० विद्यार्थ्यांना शाळेत प्रत्यक्ष प्रवेश मिळाला आहे.
यावर्षी प्रवेश प्रक्रियेत ७५१ शाळा सहभागी झाल्या असून १८ हजार ५७ अर्ज आले होते. पहिल्या फेरीत प्रवेश न घेतलेले साधारण ३ हजार विद्यार्थी आणि पहिल्या फेरीत शाळा न मिळालेले साधारण ९ हजार विद्यार्थी अद्यापही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. शाळांकडून प्रवेश नाकारण्यात येत असल्याच्या तक्रारी यावर्षीही पालकांकडून केल्या जात आहेत.