दररोज ८७ लाख लिटर पाण्याची गळती

पुणे : टेमघर धरणाची ९५ टक्के  गळती रोखल्याचा दावा करणाऱ्या जलसंपदा विभागाने या धरणातून दररोज तब्बल ८७ लाख ६० हजार लिटर पाण्याची गळती होत असल्याची लेखी कबुलीच दिली आहे. तसेच सध्या या धरणात २५०३ मिलिमीटर पाऊस झाला असून ३२०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर हे धरण १०० टक्के  भरेल, असा दावाही विभागाकडून करण्यात आला.

यंदा खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या तिन्ही धरणांपेक्षा अधिक पाऊस होऊनही हे धरण अद्यापही भरलेले नसल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने २६ ऑगस्टला प्रकाशित के ले. ‘टेमघर धरणाच्या दुरुस्तीचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. तरीदेखील या धरणातून १०१.४ लिटर प्रति सेकं द (प्रतिदिवस ८७ लाख ६० हजार ९६० लिटर) पाण्याची गळती होत आहे. हे प्रमाण ५ टक्के  एवढे आहे.’ असे मान्य करण्यात आले आहे. या धरणाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी भामा आसखेड धरण विभागाचे कार्यकारी अभियंता ना. शं. करे यांच्याकडे आहे. करे यांनी ही माहिती दिली.

‘या धरणामध्ये २०१६ मध्ये २५८७ लिटर प्रति सेकं द पाणी गळती सुरू होती. दुरुस्तीची कामे करण्यात आल्यानंतर सध्या १०१.४ लिटर प्रति सेकं द पाणी गळती होत आहे. त्यामुळे ९५ टक्के  गळती कमी झाली असून अजूनही पाच टक्के  गळती होत आहे. धरणाच्या ग्राऊटिंगचे २० टक्के  आणि शॉटक्रिटचे ६० टक्के  काम बाकी आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर गळती १०० टक्के  आटोक्या येणार आहे’, असे करे यांनी लेखी पत्रात नमूद के ले आहे.

टेमघर धरणात आतापर्यंत २५०३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ३२०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतर हे धरण १०० टक्के  भरेल.

यंदा धरणाच्या लाभक्षत्रामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी ५२०० मि.मी. पाऊस पडला असल्याने सहा अब्ज घनफू ट (टीएमसी) पाणी धरणात आले होते. त्यापैकी ३.८१ टीएमसी पाणी धरणात ठेवून उर्वरित २.१८ टीएमसी पाणी धरणातून सोडण्यात आले होते, असेही करे यांनी सांगितले.

टेमघर धरणाची गळती गंभीरच

धरणाची लांबी, उंची आणि पाणीसाठवण क्षमता यावर गळतीचे प्रमाण सामन्यपणे ठरवले जाते. त्यानुसार टेमघर धरणात ७५ लिटर प्रति सेकं द पाणीगळती हे प्रमाण सामान्य ठरते. सध्या १०१.४ लिटर प्रति सेकं द पाणीगळती होत असल्याने या धरणातून होणारी गळती अद्यापही गंभीर असल्याचे जलसंपदा विभागाने मान्य के ल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.