प्रथमेश गोडबोले, लोकसत्ता

पुणे : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी सातबारा संगणकीकरण प्रकल्पांतर्गत आतापर्यंत ९९ टक्के  म्हणजेच दोन कोटी ५० लाख सातबारा उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त करण्यात महसूल विभागाला यश मिळाले आहे. तसेच, २१ लाख ७७ हजार डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारे डाउनलोड करण्यात आले आहेत.

राष्ट्रीय भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रम (एनएलआरएमपी) अंतर्गत सर्व जिल्ह्य़ातील ग्रामीण अधिकार अभिलेखांचे संगणकीकरण सन २००२-०३ पासून सुरू  झाले. सन २०१०-११ पर्यंत ते जिल्हा स्तरावरच संगणकीकृत के ले जात होते. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने ग्रामीण भागातील भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रम (डीआयएलआरएमपी) अंतर्गत सुरू असलेल्या ई-फे रफार प्रकल्पाद्वारे संगणकीकरण पूर्ण करून सन २०१५-१६ पासून सर्व संगणकीकृत अधिकार अभिलेख ऑनलाइन करण्यात आले. राज्यातील ३५ जिल्ह्य़ांमधील ३५८ तालुक्यातील दोन कोटी ५३ लाख गाव नमुना क्र. सातबारा ऑनलाइन करून त्यातील त्रुटी दूर करुन  हे काम पूर्णत्वाकडे नेण्यात आले आहे.

सन २०१८-१९ पासून राज्यातील सर्व ऑनलाइन अधिकार अभिलेख डिजिटल स्वाक्षरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. एक कोटी ४० लाख सातबारा डिजिटल स्वाक्षरित झाल्यानंतर २० सप्टेंबर २०१९ पासून डिजिटल स्वाक्षरित सातबारा नागरिकांना ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी ‘महाभूमी’ संके तस्थळ सुरू करण्यात आले आहे.

सद्य:स्थितीत दोन कोटी ५३ लाख सातबारांपैकी ९९ टक्के  म्हणजेच दोन कोटी ५० लाख सातबारा डिजिटल स्वाक्षरित झाले असून ते महाभूमी संकेतस्थळावर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. एका वर्षांत या संके तस्थळावरून प्रति सातबारा १५ रुपये एवढे नक्कल शुल्क डिजिटल भरणा करुन २१ लाख ७७ हजार डिजिटल स्वाक्षरित सातबारा डाउनलोड झाले आहेत,अशी माहिती ई-फे रफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली.

तीन कोटी ४३ लाखांचा महसूल

महसूल दिनापासून म्हणजे चालू वर्षी १ ऑगस्टपासून डिजिटल स्वाक्षरित आठ-अ (खाते उतारा) देखील नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. आतापर्यंत १.१० लाख डिजिटल स्वाक्षरित खाते उतारे देखील महाभूमी संके तस्थळावरून डाउनलोड झाले आहेत. या डिजिटल स्वाक्षरित सातबारा आणि आठ-अ वितरणातून शासनाला तीन कोटी ४३ लाख रुपये महसूल नक्कल शुल्क स्वरूपात प्राप्त झाला आहे.

दोन लाख ४९ हजार नोंदणीकृत वापरकर्ते महाभूमी संके तस्थळाचा वापर करतात. यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच महा ई-सेवा केंद्र चालक, सेतू चालक, संग्राम केंद्र चालक, खासगी व्यावसायिक, वकील, बांधकाम व्यावसायिक, अभियंते, इस्टेट एजंट, कर मार्गदर्शक यांचा समावेश आहे. दररोज दहा ते पंधरा हजार डिजिटल स्वाक्षरित सातबारा उतारे या संके तस्थळावरून डाउनलोड के ले जात आहेत. 

–  रामदास जगताप, राज्य समन्वयक, ई-फे रफार प्रकल्प