आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट

पुणे : फेब्रुवारीच्या २७ तारखेपर्यंत सातत्याने वाढत असलेले पेट्रोल आणि डिझेलचे दर गेली २५ दिवस स्थित होते. त्यानंतर गुरुवारी पेट्रोलच्या दरांमध्ये लिटरमागे केवळ १७ पैशांची घट झाली. पुण्यात पेट्रोलचा दर ९७.०२ रुपये, तर डिझेलचा दर ८६.७० रुपये लिटर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे दर कमी झाल्याचे ऑल इंडिया पेट्रोल डिलर असोसिएशनने सांगितले.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढणाऱ्या किमती आणि त्यापूर्वी केंद्र, राज्य शासनाने इंधनावर वाढविलेले कर यामुळे इंधनाच्या वाढलेल्या दरांनी फेब्रुवारीमध्ये नवनवे उच्चांक निर्माण केले. राज्यात अनेक ठिकाणी साधे पेट्रोलही शंभरीपार गेले आहे. पुण्यातही पॉवर पेट्रोलचा दर २० फेब्रुवारीला शंभरीपार गेला. साधे पेट्रोल शंभरीच्या जवळ येऊन ठेपले.  गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पेट्रोलच्या दराने ९० रुपयांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर सातत्याने काही पैशांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतच राहिले. पुण्यात यापूर्वी कधीच पेट्रोलचे दर ९३ रुपयांपुढे गेले नव्हते. ५ फेब्रुवारीला मात्र पेट्रोल ९३ रुपयांपुढे गेले. त्यानंतरही दरात सातत्याने वाढ सुरूच राहिल्याने दराचा रोज नवा उच्चांक होत गेला.

६ जानेवारीपासून प्रामुख्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ सुरू झाली. फेब्रुवारीमध्ये २, ६, ७ आणि २१ तारखेला दरवाढ झाली नव्हती. जानेवारीतही १७, २०, २५, २८ आदी तारखांना दरवाढ झाली नव्हती. फेब्रुवारीच्या २७ तारखेला शेवटची दरवाढ झाली होती. या दिवशी पेट्रोलचा दर ९७.१९ रुपये, तर डिझेलचा दर ८६.८८ रुपये होता. साधे पेट्रोल १००.८७ रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर २५ दिवस इंधनाच्या दरात कोणतीही वाढ किंवा घट झाली नाही. गुरुवारी मात्र पेट्रोलच्या दरात १७ पैसे, तर डिझेलच्या दरात १८ पैशांची घट नोंदविण्यात आली. ऑल इंडिया पेट्रोल डिलर असोसिएशनचे अध्यक्ष अली दारुवाला यांनी याबाबत सांगितले, की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या बॅरलची किंमत १० डॉलरने कमी झाल्याने त्याचा फायदा नागरिकांना देण्यात येत आहे.

पुण्यातील इंधन दरवाढ

(प्रतिलिटर दर रुपयांत)

दिनांक            पेट्रोल   डिझेल

२० नोव्हेंबर     ८७.६७  ७५.७१

७ डिसेंबर        ९०.००  ७८.९७

१४ जानेवारी     ९१.००  ८०.०६

५ फेब्रुवारी       ९३.१४  ८२.३८

२० फेब्रुवारी      ९६.६२  ८६.३६

२७ फेब्रुवारी     ९७.१९  ८६.८८

२४ मार्च            ९७.०२  ८६.७०