श्रीराम ओक shriram.oak@expressindia.com

विविध प्रकारच्या अपंगत्वामुळे पालकांवर अवलंबून असलेली मुले आणि त्यामुळे विविध समस्यांना सामोरे जाणारे संपूर्ण कुटुंब यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने स्थापना झालेले उपचार केंद्र हे ‘सेवासहयोग’च्या सहकार्याने एक उपचार केंद्र पांडवनगर येथे कार्यरत आहे. ज्याचा लाभ विविध प्रकाराने अपंगत्व आलेल्या मुलांना होतो आहे.

‘सेवासहयोग’च्या सहकार्याने कार्यरत असलेले एक उपचार केंद्र जुलै २०१७ पासून पांडवनगर परिसरात कार्यरत असून तेथे बारा वर्षांपर्यंतची बारा मुले आणि मुलीदेखील त्यांच्या अपंगत्वावर मात करण्यासाठी विविध प्रकारचे उपचार घेत आहेत, शिकत आहेत. सेवासहयोगच्या सर्वेक्षणांतर्गत ऑस्टीटिक, सेरेब्रल पाल्सी, मतिमंदत्व अशा विविध प्रकारच्या अपंगत्वावर निन्मआर्थिक स्तरातील विद्यार्थ्यांना मात करता यावी म्हणून हे उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. या मुलांकडे वैयक्तिक लक्ष देत प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक-एक थेरपीस्ट कार्यरत असतो. सकाळी नऊ ते बारा या कालावधीत पांडवनगर येथील अंगणवाडीत हे केंद्र चालविले जाते. या केंद्राच्या माध्यमातून येथील उपचारपद्धतीने प्रगती झालेल्या दोन मुलांना कामायनी येथे प्रवेश घेण्यात केंद्र यशस्वी झाले आहे.

सामाजिक कार्यात काही वर्ष कार्यरत असणाऱ्या कार्यकर्तीने अभ्यासपूर्वक या उपचार केंद्राची स्थापना केली आहे. या केंद्राचा प्रमुख उद्देश म्हणजे अपंगत्वावर मात करण्यासाठी विविध कार्यान्वित योजनांचा लाभ जसा आवश्यक असतो तेवढेच महत्त्वाचे असते परिवाराचे पाठबळ. पण अनेकदा अपंग मुलांचा सांभाळ आणि त्यांच्याबरोबरच पालकांची होणारी तारांबळ, आर्थिक, मानसिक ताण यातून त्या कुटुंबाला सुयोग्य दिशा देण्याचे कार्य हे केंद्र करते.

या केंद्रात येणाऱ्या मुलांशिवाय वस्त्यांमधील अपंगत्वाचा सामना करणाऱ्या मुलांसाठीदेखील हे केंद्र कार्यरत आहे. दानशूर व्यक्तींचे आर्थिक पाठबळ सेवासहयोगच्या मार्फत मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष सहभाग यातून डोंगरे सभागृह आणि पीएमसी वसाहतीजवळील अंगणवाडी येथे या संस्थेचे कार्य सुरू आहे. सुरुवातीला मुलांना घरोघरी जाऊन उपचार पद्धती दिली जात असे, पण हळूहळू या जागांचा विनियोग संस्थेला करता येऊ लागला. विद्यार्थ्यांना रंग, आकडे, अक्षर, आकार, हाताच्या-बोटांच्या हालचाली, स्वत:चे नाव, पालकांचे नाव सांगता येणे अशा प्रकारच्या मूलभूत शिक्षणाबरोबरच स्पीच थेरपीसारख्या विविध उपचारपद्धतींचा विनियोग केला जातो.

अनिता घाटणेकर यांनी सुरू केलेल्या या केंद्रात श्रुती वाडेकर, शीतल ओव्हाळ, पूजा गायवळ या तिघीजणी त्यांना सहाय्य करतात. याशिवाय कामायनीबरोबरच विविध रुग्णालये आणि सामाजिक संस्थांच्या स्वमदत गटांसाठीदेखील केंद्र कार्यरत आहे. या केंद्राचा लाभ घ्यायचा असेल किंवा केंद्र पाहायचे असेल तर घाटणेकर यांच्याशी ९८८१७१४८९० या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

या विविध कामांबरोबरच केंद्रात येणाऱ्या तीन वर्षीय मुलीची हृदयशस्त्रक्रियादेखील केंद्राच्या माध्यमातून पार पडली असून त्यासाठी केंद्रातील मंडळींबरोबरच विविध सामाजिक संस्थांमधील कार्यकर्त्यांनी यासाठी मदतीचा हात पुढे केला होता.