News Flash

रिक्षाचालकांचे भाडे नाकारणे सुरुच

शहरात कोठेही मीटरनुसार प्रवाशांना सेवा देणे रिक्षा चालकांसाठी क्रमप्राप्त असले, तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

शहरातील अनेक रस्त्यांवर दिसणारे रिक्षांच्या बेशिस्त पार्किंगचे हे नेहमीचे चित्र.

 

भाडे नाकारणे त्याचप्रमाणे गणवेश आणि बिल्ला न वापरणाऱ्या नियमबाह्य रिक्षा चालकांवर ठोस कारवाईची कोणतीही यंत्रणा नसल्याचे दिसून येत आहे. रिक्षा चालकांकडून शहरातील काही भागात येण्यास नकार दिला जातो. त्याचप्रमाणे मध्यवस्तीतही अनेकदा भाडे नाकारण्यात येत असल्याच्या तक्रारी करण्यात येतात. रिक्षा चालकाचा गणवेश व अधिकृत बिल्ला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असताना काही रिक्षा चालकांकडून त्याकडे कानाडोळा करण्यात येतो आहे.

रिक्षा चालकाकडून भाडे नाकारण्याच्या प्रकाराचा रोजच अनेकांना अनुभव येतो. शहरात व्यवसाय करण्यासाठी रिक्षाचे भाडे ठरविताना शहराची भौगोलिक स्थितीही लक्षात घेतली जाते. त्यामुळे शहरात कोठेही मीटरनुसार प्रवाशांना सेवा देणे रिक्षा चालकांसाठी क्रमप्राप्त असले, तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांविरुद्ध प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार नोंदविण्याची व्यवस्था आहे. मात्र, अनेक प्रवासी त्यासाठी वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडूनच याबाबत ठोस उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी होत आहे. वर्षभरापूर्वी वाहतूक पोलिसांनी याबाबत कारवाई सुरू केली होती. साध्या वेशातील पोलीस शहरातील विविध ठिकाणी प्रवासी म्हणून उभे राहून भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करीत होते. या प्रकाराने रिक्षा चालकांमध्ये चांगलीच जरब बसली होती. परंतु, कालांतराने ही कारवाईही बंद करण्यात आली. त्यामुळे भाडे नाकारण्याच्या तक्रारी पुन्हा वाढल्या आहेत.रिक्षा चालकांशी संबंधित गुन्हेगारीच्या काही घटना शहरात घडल्यानंतर रिक्षा चालकांना गणवेश व बिल्ला सक्तीचा करण्यात आला आहे. चालकांसाठी खाकी, तर मालकांनी पांढऱ्या रंगाचा गणवेश वापरणे सक्तीचे आहे. त्याचप्रमाणे व्यवसाय करीत असताना प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दिला जाणारा बिल्ला त्यांनी लावणे बंधनकारक आहे. सक्ती करण्यात आल्यानंतर सुरुवातीला याबाबत मोठय़ा प्रमाणावर कारवाई झाली. त्यानंतर ही कारवाई बंद झाली. सद्य:स्थितीत शहरालगतच्या भागात बहुतांश रिक्षा चालक ही सक्ती पाळत नाहीत. शहराच्या मध्यवर्ती भागातही रिक्षा चालक बिल्ला वापरत नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 3:49 am

Web Title: auto rickshaw issue in pune
Next Stories
1 शहरबात पिंपरी-चिंचवड : अस्ताव्यस्त प्रभागांची धास्ती अन् सक्षम उमेदवारांची वानवा
2 हिरवा कोपरा : घरच्या घरी कांदा, गाजर, मुळा भाजी
3 राज्यमंत्री महादेव जानकर यांच्या कार्यालयाची राष्ट्रवादीकडून तोडफोड
Just Now!
X