गुजरात दंगल आणि गोध्रा कांड घडवून आणल्याचे निवृत्त न्या. पी बी सावंत यांनी आपल्या अहवालात म्हटले होते. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना देशात कुठलेही संवैधानिक पद देऊ नये, असेही सावंत यांनी अहवालात नमूद केले होते. गुजरातप्रयोगाप्रमाणे देश सध्या चालत असून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. मी सावंत यांचा शिष्य आहे म्हणून मोदींविरोधात बोलतो, त्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले जातात, असा आरोप निवृत्त न्या. बी जी कोळसे पाटील यांनी केला.

आनंद तेलतुंबडेंसह इतर १० कार्यकर्त्यांविरोधात होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज (सोमवार) पुण्यातील महात्मा फुले वाड्यात पुरोगामी संघटनांकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, मोदींना मारण्याचा कट आहे, असे जर त्यांचे म्हणणे असेल तर त्यांनी संपूर्ण इतिहास पाहायलाच हवा. यासाठी गुजरात दंगलीवरील न्या पी बी सावंत यांचा अहवाल वाचलाच पाहिजे. त्यांनी गुजरात दंगल आणि गोध्रा कांड हे घडवलेले असून मोदी, शाहंवर खटला भरला पाहिजे असे सावंत यांनी आपल्या अहवालात म्हटले होते.

याप्रकरणी गुजरातमध्ये हरेन पंड्या हे साक्षीला आल्यानंतर सावंत यांनी त्यांना भीती वाटत नाही का, असा सवालही विचारला होता. त्यावेळीही खोटे गुन्हे दाखल केले होते. आताही गुजरात प्रयोगाप्रमाणेच देश चालवला जात आहे. आम्ही काही गुंड प्रवृत्तीचे लोक नाहीत. आमची पार्श्वभूमीही तशी नाही. केवळ न्या. सावंत यांनी अहवाल दिला आणि मी सावंत यांचा शिष्य आहे म्हणून मोदींविरोधात बोलतो, त्यासाठीच हे सुरू असल्याचे ते म्हणाले.