वाजपेयींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारसह २०१४ पूर्वीचे राजकारण आणि नंतरच्या कालखंडातील राजकारण यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. आता देशातील राजकारणात काळेकुट्ट नभ दाटून आले असून राजकारणाचा संपूर्ण पटच बदलला आहे. स्वातंत्र्यानंतर देशाला वेगळ्या वळणाकडे नेण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र, त्याला आता वेगळ्याच वळणाकडे नेण्याचा प्रयत्न सुरू असून राजकारणाचा पट नव्याने मांडावा लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी केले.
पुणे नवरात्र महोत्सवातर्फे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते भाई वैद्य यांना महर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, अंकुश काकडे, डॉ. प्र. ल. गावडे, डॉ. विनोद शहा, डॉ. अभिजित वैद्य आणि महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागूल या वेळी उपस्थित होते.
देवी दैत्याला मारते हे राजकारणच आहे. राजकारणातही दैत्य आहेत. त्यामुळे मी राजकारणावर भाष्य करीत असल्याचे सांगून वैद्य म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या राजकारणाचा मी साक्षीदार आहे. मात्र, आता राजकारण बदलले असून अल्पसंख्य भयभीत झाले आहेत. लोकशाहीवादी आणि उदारमतवादी पक्षांना एकत्रितपणे उजव्या विचारसरणी विरोधात आघाडी करावी लागेल. सध्याचे वातावरण दडपशाही आणि भीतीचे असल्याची जाणीव झाल्यामुळे साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत केले. राजकारण्यांना उशिरा जाग येते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, काँग्रेसने देशामध्ये समतेचे वातावरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला छेद दिला जात आहे. त्याविरोधात सर्वानी एकत्र येऊन आंदोलन करावेच लागेल. सामान्य माणसाच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आयुष्य खर्ची घालणारे भाई वैद्य आजही आंदोलने करतात. समाजाचे वाईट होऊ नये असा विचार करणारे वैद्य हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व आहे.