पिंपरी-चिंचवडमधील एका डॉक्टर महिलेसह देशभरात अनेक महिलांना गंडा घालणाऱ्या नायजेरियन इसमाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. अझुबुके अरिबीके असं या आरोपीचं नाव असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

अवश्य वाचा – नोकरीतील नैराश्यातून चिंचवडमध्ये तरुणाची आत्महत्या

पिंपरी-चिंचवड परिसरातील डॉ. प्रतिभा शामकुवर यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपल्या मित्राने तब्बल ४१ लाख ८२ हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती. या तक्रारीवरुन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजय भोसले यांच्या पथकाने या प्रकरणाचा कसून तपास केला. अखेर दिल्लीतून पोलिसांनी अझुबुके अरिबीके या ३८ वर्षीय इसमाला अटक केली, अधिक चौकशी केली असता आरोपीने फेसबुकच्या माध्यमातून आपण अनेक महिलांना फसवलं असल्याचं मान्य केलं.

आतापर्यंत आरोपीने बंगळुरु येथील एका महिलेला ६० लाख, कुलू मनाली येथील महिलेला ३० लाख, वसई येथील महिलेला ८ लाख, निगडी येथील एका महिलेला ५ लाख तर तक्रार करणाऱ्या डॉक्टर महिलेला ४२ लाख रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आलंय. या सर्व महिला उच्च शिक्षीत असून ४५ ते ५० वयोगटातील महिलांना आरोपीने आपलं लक्ष्य बनल्याचं पोलिसांनी सांगितलं.

आरोपी अझुबुके अरिबिके हा फेसबुक वरून पीडित महिलांशी मैत्री करायचा आणि त्यांना मी परदेशात असल्याचे भासवून विश्वासात घ्यायचा. तुम्हाला गिफ्ट पाठवतो त्यात सोन्याचे दागिने आणि डॉलर पाठविले आहेत, अशी माहिती देऊन ते गिफ्ट कस्टम कडून सोडवा अस सांगायचा. यानंतर त्याच्याच साथीदार महिलांना फोन करून बँकेत लाखो रुपये भरायला लावायचा, अशी माहिती समोर आली आहे. यामुळे महिला वर्गाने फेसबुक वरील अनोळखी मित्रांवर विश्वास ठेवून नये असे आवाहन पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी केले आहे.