नवाझ शरीफ यांना शपथविधीसाठी बोलावून भाजप, शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या ‘कथनी’ व ‘करणी’तील फरक दाखवून दिला आहे, अशी टीका आपचे जिल्हा समन्वयक मारूती भापकर यांनी केली आहे. खेळपट्टय़ा उद्ध्वस्त करणारे शिवसेनेचे ‘वाघ’ आता काय भूमिका घेणार, असा खोचक प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना निमंत्रण देण्यात आले, त्याविषयी तीव्र संताप व्यक्त करणारे निवेदन भापकरांनी प्रसिध्दीस दिले आहे. कारगील घडवून हजारो जवानांचे बळी ज्यांनी घेतले. भारतात बॉम्बस्फोट घडवून शेकडो निष्पाप नागरिकांचे ज्यांनी बळी घेतले, संसदेवर, मुंबईवर हल्ला केला, अशा  पाकिस्तानच्या पंतप्रधानांना शपथविधीचे निमंत्रण पाठवणे निषेधार्ह आहे. पाकचे खेळाडू खेळणार असलेल्या खेळपट्टय़ा उद्ध्वस्त करणारे, पाक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम उधळणारे शिवसेना नेते उद्धव ठाकरे व त्यांचे १८ खासदार आता काय भूमिका घेणार, की त्यांचे मांजर होऊन ते बिळात लपून बसणार, हा प्रश्नच आहे. या खोटारडय़ा व दुट्टपीपणाचा आपकडून निषेध करण्यात येत असल्याचे भापकर यांनी म्हटले आहे.