नगर रस्त्यावरील बीआरटीचा नवीन मार्ग १५ एप्रिलपासून सुरू करण्याचा आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी महापालिका आणि पीएमपी प्रशासनाला दिला असला, तरी बीआरटीचे नवे मार्ग सुरू करण्याचा देखावाच केला जात असल्याचे ठिकठिकाणी दिसत आहे. गेल्या तीनचार महिन्यांत घाईगर्दीने सुरू केलेल्या बीआरटी मार्गामध्ये अनेक त्रुटी राहिल्या असून त्या दूर करण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याचीही वस्तुस्थिती समोर आली आहे.
महापौर प्रशांत जगताप यांनी गेल्या पंधरवडय़ात शहरातील विविध विकासकामांना तसेच प्रकल्पांना भेट देऊन त्यांच्या सद्य:स्थितीची पाहणी केली. नगर रस्ता बीआरटी प्रकल्पालाही त्यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. नगर रस्ता बीआरटीचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मात्र अद्यापही ते पूर्ण झालेले नाही. या कामाची पाहणी केल्यानंतर तसेच अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर नगर रस्ता बीआरटी १५ एप्रिलपासून सुरू करण्याचा आदेश महापौरांनी दिला. त्या दृष्टीने प्रशासनाकडून १५ एप्रिल रोजी हा मार्ग सुरू करण्याची तयारी केली जात आहे.
शहरात वेगवेगळे बीआरटी मार्ग घाईने सुरू केले जात असले, तरी असे जे मार्ग अलीकडच्या काळात सुरू करण्यात आले आहेत, त्यात अनेक त्रुटी असून त्या गंभीर स्वरूपाच्या आहेत. या त्रुटींकडे प्रवाशांनी तक्रारी करून लक्ष वेधले आहे. तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांनीही त्याबाबत निवेदने देऊन त्रुटी दूर करण्याची मागणी वेळोवेळी केली आहे. मात्र त्या दूर करण्याकडे प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. विश्रांतवाडी रस्त्यावर जो बीआरटी मार्ग सुरू करण्यात आला आहे, त्या मार्गातील त्रुटींकडे लक्ष वेधल्यानंतर त्याबाबत आश्वासने देण्यात आली होती. मात्र त्याप्रमाणे कार्यवाही झाली नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे.
पीएमपी प्रवासी मंचचे अध्यक्ष जुगल राठी यांनी सांगवी ते किवळे या बीआरटीच्या नव्या मार्गावरील त्रुटींबाबत ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले, की बीआरटी मार्गावरील थांब्यावर बीआरटी मार्गातील गाडी उभी राहिल्यानंतर थांबा आणि गाडी यात अंतर राहता कामा नये, अशी अपेक्षा असताना मार्गावरील गाडी आणि बीआरटीचा फलाट यात मोठी फट राहत आहे. काही ठिकाणी ती नऊ ते बारा इंच एवढी आहे तर काही थांब्यांवर ती पंधरा इंचांपर्यंत असल्याचे दिसले. गाडीत चढ-उतार करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार होणे व तशी कृती होणे आवश्यक असताना या मोठय़ा त्रुटीकडेही पीएमपी प्रशासनाचे लक्ष नाही. याच मार्गावरील गाडय़ांचे डावे व उजवे हे दोन्ही दरवाजे उघडेच राहत होते. त्याबाबत वाहकाकडे विचारणा केली असता त्याने तशी तक्रार केली होती. मात्र दरवाजे नादुरुस्त असलेली गाडी त्याला घेऊन जायला सांगण्यात आले. एकूणच बीआरटी मार्गावर ज्या अगदी मूलभूत गोष्टींची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, त्याकडेही दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

नगर रस्ता बीआरटी मार्ग सुरू करण्याची नेहमीप्रमाणेच घाई केली जात आहे. वाघोली टर्मिनलची जागा अद्याप पीएमपीला मिळालेली नाही. विश्रांतवाडी बीआरटी मार्गाचेही प्रश्नही सुटलेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. गाडय़ा उभ्या करण्यासाठी तेथे जागा नाही. केवळ कामे पूर्ण झाली असे दाखवायचे आणि नवे मार्ग आवश्यक सुविधा नसतानाही रेटून न्यायचे असा प्रकार प्रशासनाकडून सुरू आहे.
जुगल राठी, अध्यक्ष, पीएमपी प्रवासी मंच