पुलंच्या षष्टय़ब्दीपूर्तीला एक फळांचा व्यापारी त्यांना भेटायला गेला. मी तुमचा चाहता आहे असे म्हणत त्याने साठ सफरचंदांचा हार पुलंच्या गळ्यात घातला. त्यावर ‘नशीब, तुम्ही नारळाचे व्यापारी नाहीत’, अशी कोटी पुलंनी केली. हा किस्सा सांगत पुलंच्या विनोदावर गुरुवारी मिरासदारांची मोहोर उमटली गेली.
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या पुलकित विनोदावर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांनी त्यांच्या खास शैलीत भाष्य केले. पुलंच्या विनोदाचे वैविध्य उलगडून सांगताना मिरासदार यांच्या कथाकथन शैलीला रसिकांनी हास्यकल्लोळाची साथ दिली. आशय सांस्कृतिक आणि स्क्वेअर वन इव्हेंट्स मीडियातर्फे आयोजित पुलोत्सव तपपूर्ती समारंभाचे उद्घाटन मिरासदार यांच्या हस्ते झाले. कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, डॉ. मुकुंद अभ्यंकर, कृष्णकुमार गोयल, आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, नयनीश देशपांडे आणि मयूर वैद्य या वेळी उपस्थित होते.
पुलंची प्रतिभा विलक्षण होती. विजेसारखा चमकदार असा त्यांचा विनोद होता. गोष्ट सांगताना ते श्रोत्यांना हसवता हसवता अंतर्मुख होईल असे काही तरी सांगून जात असत. त्यांचे सामाजिक भान मोठे होते. रक्त साठविण्याच्या यंत्रासाठी त्यांनी कथाकथनाचे कार्यक्रम करून ४० हजार रुपये मिळवून दिले होते. नकळत आनंद देणारा त्यांचा विनोद मोठा होता, असे सांगतानाच मिरासदार यांनी पुलंचे अनेक किस्से कथन करीत श्रोत्यांना हास्याची सफर घडविली. नांदेडच्या संमेलनाचे पुलं अध्यक्ष होते. त्या वेळी आचार्य अत्रे यांनी ‘मावळत्या विनोदवीराकडून उगवत्या विनोदवीराला नमस्कार’ अशा शब्दांत पुलंचा गौरव केला होता, अशी आठवणही मिरासदार यांनी सांगितली. सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले.