भामा आसखेड धरणातून पुण्याला पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या शासकीय परवानगीच्या प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा, असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी विविध शासकीय विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्वय बैठकीत दिला.
येरवडा, चंदननगर, खराडीसह नगर रस्ता परिसराचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याची योजना पुणे महापालिकेने आखली आहे. या योजनेला राज्य शासनासह केंद्रानेही परवानगी दिली असून योजनेतील काही कामे केंद्र सरकारच्या नेहरू योजनेअंतर्गत केली जाणार आहेत. या योजनेसाठी जी जलवाहिनी टाकली जाणार आहे त्यातून पिंपरी-चिंचवडलाही पाणी देण्याची मागणी गेल्या महिन्यात मान्य झाली आहे.
या योजनेच्या कार्यवाहीत समन्वय साधण्याच्या दृष्टीने शनिवारी साखर संकुल येथे बैठक बोलावण्यात आली होती. पुणे महापालिका, पिंपरी महापालिका, जिल्हा प्रशासन, महावितरण, आळंदी नगरपालिका, एमआयडीसी, पाटबंधारे विभाग, महसूल विभाग, वन विभाग आदींशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. बैठकीच्या प्रारंभी पुण्याचे आयुक्त महेश पाठक यांनी योजनेचे सादरीकरण केले. त्यानंतर ही योजना मार्गी लावण्यासाठी कोणकोणत्या विभागांचे काय सहकार्य लागणार आहे याचीही माहिती देण्यात आली.
जलवाहिनी टाकण्यासाठी एमआयडीसीची परवानगी आवश्यक असून पंपिंग हाउससाठी पाटबंधारे विभागाची परवानगी लागणार आहे. तसेच अन्यही अनेक परवानग्या आवश्यक असून त्याबाबत त्या त्या अधिकाऱ्यांशी बैठकीत चर्चा झाली. ज्या खात्यांकडे तसे प्रस्ताव आले आहेत, त्यांनी ते लवकरात लवकर मार्गी लावावेत तसेच ते आले नसतील, तर तसे प्रस्ताव संबंधितांकडे पाठवावेत असा आदेश या वेळी पवार यांनी दिला. योजनेसाठी विविध विभागांचे सहकार्य आवश्यक असून त्यासाठी योग्य ती कार्यवाही तातडीने करा, असेही त्यांनी या वेळी सांगितले.