काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांची टीका; हुकुमशाहीकडे वाटचाल

विकासाचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले भारतीय जनता पक्षाचे सरकार विनाशाचे राजकारण करत असून सध्या त्यांची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरू आहे, अशी  टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे. काँग्रेस पक्षाची देशासाठी बलिदानाची परंपरा असताना भारताच्या स्वातंत्र्यलढय़ात भाजपचे काय योगदान होते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मोटारीवर गुजरात येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पिंपरी शहर काँग्रेसने आंबेडकर चौकात निदर्शने केली, तेव्हा ते बोलत होते. महिला अध्यक्षा गिरीजा कुदळे, सेवा दलाचे अध्यक्ष संग्राम तावडे, प्रदेश पदाधिकारी श्यामला सोनवणे, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, मागासवर्गीय सेलचे गौतम आरकडे, विष्णुपंत नेवाळे, बाळासाहेब साळुंखे, नरेंद्र बनसोडे, मयूर जैयस्वाल, विशाल कसबे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

साठे म्हणाले, हिंदुत्वाच्या नावाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून समाजात विषाची पेरणी सुरू आहे. महात्मा गांधी यांच्या अिहसेच्या विचारसरणीला तिलांजली देऊन नथुरामाची विचारसरणी रुजविण्याचा त्यांचा गुप्त अजेंडा आहे. त्यातूनच गुजरातमध्ये राहुल गांधी यांच्या मोटारीवर हल्ला चढवण्यात आला. अशा भ्याड हल्ल्यांना काँग्रेस कधीही घाबरणार नाही. देशासाठी वेळप्रसंगी काँगेस नेत्यांनी जिवाचे बलिदान दिल्याचा इतिहास आहे. मात्र, भाजपने स्वातंत्र्यासाठी काय केले, असा मुद्दा साठे यांनी उपस्थित केला. यावेळी श्यामला सोनवणे, गिरीजा कुदळे, नरेंद्र बनसोडे, मयूर जैयस्वाल, विशाल कसबे आदींची भाषणे झाली.