स्वच्छता सेवकांचा नागरिकांकडून सत्कार; संचारबंदी, वाहतूक बंदी असतानाही कचरा संकलनाची सेवा कायम

पुणे : संचारबंदी, वाहतूक बंदी असे र्निबध असतानाही स्वत:च्या आरोग्याचा आणि जिवाचा धोका पत्करून पुणेकरांच्या आरोग्यासाठी दररोज कचरा संकलनाची अखंडित सेवा पुरविणाऱ्या स्वच्छता वेचकांच्या कार्याला नागरिकांनी सलाम के ला आहे. शहराच्या विविध भागांतील सोसायटय़ा, गृहप्रकल्पांमधील कचरा संकलन करणाऱ्या कचरा सेवक-सेविकांचा स्थानिक नागरिकांनी स्वयंप्रेरणेने सत्कार करून एक नवा आदर्श स्थापित के ला आहे.

काही ठिकाणी बाल्कनीत उभे रहात टाळ्या वाजवून त्यांच्या कार्याचा गौरव के ला जात आहे तर काही ठिकाणी शिधा उपलब्ध करून देण्याबरोबरच सेवक-सेविकांच्या गळ्यात नोटांचा हार घालून सेवकांचा सन्मान करण्यात येत आहे. पुणेकरांच्या या कृतीचा सुखद अनुभव कचरासेवकांना मिळत आहे.

करोना विषाणूच्या संसर्गाच्या संकटातही अनेक अडचणींवर मात करून स्वच्छ सहकारी संस्थेचे साडेतीन हजार सेवकांनी कचरासंकलनाचे काम अखंडितपणे सुरू ठेवले आहे. समाजातील आर्थिक आणि सामाजिकदृटय़ा वंचित असलेल्या स्तरातून आलेल्या या कचरावेचकांना जगण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागत आहे. करोना विषाणूच्या संसर्गामुळे या सेवकांच्या जीवनाची घडी काही प्रमाणात विस्कटली आहे. अन्नधान्य मिळविण्याची चिंता काहींना भेडसावित आहे तर कचऱ्याच्या पुनर्प्रक्रियेवर अवलंबून असलेल्या कचरा वेचकांना रोजच्या गरजा भागविण्याएवढेही उत्पन्न सध्या मिळत नाही. त्यातच सध्याच्या परिस्थितीमध्ये कचरा वेगळा करण्याचे काम हे त्यांच्या आरोग्यास हानिकारक ठरण्याचाही धोका आहे. भंगार दुकानेही बंद असल्यामुळे भंगार विकू न गुजराण करण्यातही त्यांना अडचणी येत आहेत.

मात्र सामाजिक प्रश्नांबद्दल नेहमीच आस्थेने विचार करणाऱ्या शहरातील अनेक सजग नागरिकांनी या संकटाच्या काळात पुढे येऊन या स्वच्छता दूतांच्या कार्याचा सन्मान करून एक नवा आदर्श स्थापित के ला आहे. शिधा असो किं वा शिजविलेले अन्न किं वा वैयक्तिक सुरक्षा सामग्री, नागरिकांकडून या सेवकांना साहाय्य होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

सूस पाषाण येथील पारिजात कॉलनीमध्ये दैनंदिन कचरा संकलनाचे काम करणाऱ्या रेखा कु चेकर यांना असाच एक सुखद अनुभव नुकताच मिळाला. पारिजात कॉलनीतील रहिवाशांनी आपापल्या बाल्कनीत उभे राहून, टाळ्यांचा गजर करत कु चेकर यांचे स्वागत के ले. एवढेच नाही तर त्यांच्या गळ्यात शंभर रुपयांच्या नोटांचा हारही घालण्यात आला, ज्यामध्ये एकू ण २ हजार ८०० रुपयांची रक्कम होती.

‘कचरा पुनर्प्रक्रिया प्रकल्प बंद असल्यामुळे अनेक कचरा वेचकांकडे रोजचे अन्नधान्य विकत घेण्याएवढाही पैसा उपलब्ध नव्हता. मात्र अशा प्रकारे कामाची दखल घेतली जात असेल तर काम करण्याचा उत्साह दुप्पट होतो.

स्वयंप्रेरणेने के लेल्या मदतीची आठवण माझ्या मनात कायम जपली जाईल,’ अशी प्रतिक्रिया रेखा कु चेकर यांनी व्यक्त के ली.

कार्याचे कौतुक

एकीकडे स्वत:च्या घराचा उंबरठा ओलांडताना नागरिक घाबरत आहेत. मात्र कचरा वेचक शेकडो घरांपर्यंत पोहोचून कचरा संकलन करत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी आम्ही कचरा सेविके चा सन्मान के ला, असे पारिजात सोसायटीचे अरविंद मंडलिक यांनी सांगितले.