बाजार समिती, पोलिसांच्या  नियोजनामुळे गर्दीवर नियंत्रण

पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डाच्या आवारात होणाऱ्या गर्दीला रोखण्यासाठी बाजार समिती प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या नियोजनामुळे गर्दी नियंत्रणात आली. बाजार आवारात प्रवेश करणाऱ्यांना ओळखपत्राशिवाय प्रवेश देण्यात येत नसल्याने किरकोळ खरेदीसाठी भाजीपाला बाजारात येणारे ग्राहक सोमवारी बाजारआवारात फिरकले नाहीत. उपाययोजनांमुळे भाजीपाला आणि भुसार बाजारात होणारी गर्दी नियंत्रणात आली.

शहरात करोनाचा संसर्ग वाढत आहे. मार्केटयार्डातील घाऊक बाजारात कठोर निर्बंधात खरेदीसाठी किरकोळ ग्राहकांची झुंबड होत होती. संसर्ग रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण मिळवणे आवश्यक होते. त्यासाठी बाजार समिती प्रशासन आणि पोलिसांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत घाऊक बाजारात ठोक स्वरूपात खरेदीसाठी येणारे खरेदीदार, अडते, व्यापारी, कामगार, हमाल, वाहनचालकांना बाजार समितीचे ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रशासक मधुकांत गरड, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, उपायुक्त नम्रता पाटील यांनी बाजार आवाराची पाहणी केली. बाजारात किरकोळ खरेदीदारांना प्रवेश द्यायचा नाही, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बाजार आवारातील शिवनेरी रस्ता शेतीमालाची वाहने वगळता अन्य वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सोमवारी (१९ एप्रिल) भाजीपाला, फळे, फूल, केळी तसेच गूळ-भुसार बाजारात फारशी गर्दी नव्हती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठडे उभे करण्यात आले आहेत. शेतीमाल वाहतूक करणाऱ्या  वाहनांना स्वतंत्र प्रवेशद्वारातून सोडण्यात येत आहे. सोमवारी भाजीपाला विभागात सर्व भाजीपाल्यांची मोठी आवक झाली. गूळ-भुसार बाजारात नियमित आवक झाली असून भुसार मालाचा तुटवडा नाही, अशी माहिती बाजार समितीकडून देण्यात आली.

मार्केटयार्डातील बाजारआवारात होणारी गर्दी सोमवारी नियंत्रणात आली. यापुढील काळात बाजार आवारात राबविण्यात आलेल्या उपाययोजना कायम राहणार आहेत. करोनाचा संसर्ग वाढत असून  अडते, व्यापारी, कामगार वर्ग, हमाल आदी घटकांनी नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे. – मधुकांत गरड, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती