धरणाच्या दुरूस्तीसाठी १०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांपैकी टेमघर धरणाच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. या धरणाच्या दुरूस्तीसाठी तब्बल १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच दुरूस्तीमुळे धरणातून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यात येणार नसून ऑक्टोबर महिन्यात हे धरण कामांसाठी रिकामे करण्यात येणार आहे.

टेमघर धरणाच्या कामाला सन १९९७ मध्ये सुरुवात झाली होती. २००० मध्ये धरणाचे नव्वद टक्के काम पूर्ण झाले होते. फक्त ग्राऊ टिंगचे काम शिल्लक होते. मात्र, या दरम्यान वनविभाग आणि जलसंपदा विभागामध्ये धरणाच्या जागेवरुन वाद होऊन हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यानंतर २०१० मध्ये पुन्हा धरणाच्या कामाला परवानगी मिळाली. तेव्हा ग्राऊ टिंगचे काम न करताच धरणामध्ये पाणीसाठा करण्यात आला. परिणामी, काही वर्षांतच धरणातून गळती सुरू झाली. सद्य:स्थितीत केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात येत आहे. धरण गळती थांबविण्यासाठी आतापर्यंत केलेले काम अत्यंत आधुनिक पद्धतीने करण्यात आले असून या कामामुळे धरणाचे आयुष्य ३० वर्षांनी वाढले आहे, अशी माहिती जलसंपदा प्रकल्प मंडळाचे कार्यकारी अभियंता प्रवीण कोल्हे यांनी दिली.

टेमघर धरणाची क्षमता ३.७० अब्ज घनफूट (टीएमसी) असून आतापर्यंत हे धरण २.६१ टीएमसी भरले आहे. टेमघर धरणक्षेत्रात यंदा २१४९ मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. गळतीच्या कामासाठी धरणात ७५ टक्क्य़ांपर्यंतच पाणीसाठा करण्यात येणार आहे. अजून दोन महिने पावसाळा असल्याने या धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. तसेच उर्वरित दुरूस्तीच्या कामांसाठी हे धरण ऑक्टोबरमध्ये रिकामे करण्यात येणार आहे.

धरण दुरुस्तीसाठी १०० कोटी

टेमघर धरण बांधायला २५२ कोटी रुपये एवढा खर्च झाला होता. मात्र, धरणातील पाणी गळती थांबविण्यासाठी १०० कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी आतापर्यंत ३७ कोटी  रुपये खर्च झाले आहेत. राज्यात एकूण तीन हजार आठशे लहान-मोठी धरणे आहेत. त्यांपैकी पाचशे धरणे टेमघरसारखी आहेत. पाच ते सात धरणांमधून गळती सुरू आहे. राज्यात आतापर्यंत अनेक धरणे बांधली गेली आहेत, मात्र त्या धरणांच्या दुरुस्तीचा अनुभव अद्याप नाही. टेमघर धरणाच्या दुरुस्तीचे काम हे यशस्वी काम आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यच नाही, तर देशासमोर हे काम पथदर्शी प्रकल्प म्हणून समोर आले आहे. अनेक केंद्रीय समित्या या कामाची पाहणी करण्यासाठी येऊन गेल्या असल्याचे प्रवीण कोल्हे यांनी सांगितले.