करोना संकटात माणुसकी संपली आहे की काय असा विचार करायला लावणाऱ्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पिंपरीत नुकतीच अशी एक घटना समोर आली आहे. एका कामगाराचा ह्रदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. परंतु, करोना असेल या भीतीने कामगाराचा मृतदेह पाच ते सहा तास घरातच पडून होता. मृतदेहाला कोणीही हात लावायला तयार नव्हतं. अखेर सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ननावरे यांनी पुढाकार घेत मृतदेह बाहेर काढला आणि रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन करत शुक्रवारी विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत. प्रसाद कुमार गुप्ता (४२) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

मृत पावलेला कामगार प्रसाद कुमार गुप्ता हा पिंपरीतील महात्मा फुले नगर येथे कुटुंबासह राहायचा. बिहारमधून तो कामानिमित्त पिंपरीत स्थायिक झाला होता. सर्व काही सुरळीत सुरू असताना करोनाचं संकट येऊन धडकलं आणि हातचा रोजगार गेला. लॉकडाउन झाल्याने गुप्ता कुटुंबाला घेऊन त्याच्या मूळ गावी बिहार येथे गेला. त्यानंतर काही दिवसांनी शहरातील परिस्थिती सुधारली. उद्योग, व्यवसाय सुरू झाले, त्यामुळे गुप्ता हा शहरात एकटाच परतला. दरम्यान, गुरुवारी सकाळी त्याचा राहत्या घरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शेजाऱ्यांनी घराबाहेर का येत नाही हे पाहिले असता त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.

परंतु, करोनाच्या भीतीने कोणीही मृतदेहाला हात लावण्यास किंवा बाहेर काढण्यास पुढे येत नव्हतं. सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत मृतदेह घरातच पडून होता. अखेर सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ननावरे यांनी पुढे येऊन सहकारी मित्रांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. महानगरपालिका पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शवविच्छेदन केले तेव्हा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं. कुटुंबातील सदस्यांची परिस्थिती नाजूक असल्याने मृतदेह बिहारला घेऊन जाण्यास किंवा शहरात येण्यास ते असमर्थ होते. शुक्रवारी रात्री उशिरा नातेवाईकांची परवानगी घेऊन व्हाट्सऍप कॉलद्वारे शेवटचे अंतिम दर्शन घडवून ननावरे यांनी मयत प्रसाद कुमार गुप्ता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.