प्राणी प्रेमाने पाळलेल्या मांजरांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्ष आणि खासदार वंदना चव्हाण यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या विजय नावडीकर यांच्याविरोधात चव्हाण पाच कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. स्वतः वंदना चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली.
चव्हाण म्हणाल्या, माझ्यावर करण्यात आलेल्या खोट्या आरोपांमुळे नाहक माझी बदनामी झाली आहे. या सगळ्यामुळे मला प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे मी त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे आणि पाच कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी करणार आहे. लवकरच नावडीकर यांना नोटीस बजावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
वंदना चव्हाण यांनी मांजरांना मारहाण केल्याच्या आरोपावरून प्राणीप्रेमी विजय नावडीकर यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी. कुलकर्णी यांनी वंदना चव्हाण त्यांचे पती हेमंत चव्हाण, मुरार चव्हाण आणि भार्गवी चव्हाण यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. नावडीकर पीपल्स फॉर अनिमल संघटनेचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी घरी मांजरे पाळली आहेत. सन २०१२ मध्ये नावडीकर यांच्याविरोधात चव्हाण यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मांजरांपासून होणाऱ्या त्रासाबाबत ही तक्रार करण्यात आली होती.
यानंतर नावडीकर यांनी चव्हाण यांच्याविरोधात मांजरांना काठी व सळईने मारहाण केल्याची तक्रार न्यायालयात करून दाद मागितली होती. चव्हाण यांनी मारहाण केल्यामुळे एक मांजर जायबंदी झाल्याचा आरोप नावडीकर यांनी केला होता.