भटक्या जाती-जमातींना स्वतंत्र खाते आणि अनुसूचित जमातींना मिळणाऱ्या सवलती लागू कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र भटक्या जाती-जमाती महासंघाने शनिवारी केली. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी योग्य निर्णय न घेतल्यास भटक्या जाती-जमाती सरकारविरोधात मतदान करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
भटक्या जाती-जमातींसाठी आजपर्यंत अग्रवाल आयोग, बापट आयोग आणि रेणके आयोग असे तीन आयोग स्थापन झाले. मात्र, भटक्या जाती-जमातींना आजतागायत कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. आता पुन्हा नवीन आयोगाची शिफारस करण्यात आली आहे. महासंघातर्फे यापुढे कोणत्याही आयोगाची शिफारस न स्वीकारण्याचा निर्णय झाला असल्याचे महासंघाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप परदेशी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. वेळोवेळी धरणे आंदोलन, रास्ता रोको, वैयक्तिक भेटीगाठी आणि सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भटक्यांच्या मागण्या सरकापर्यंत पोहोचविण्यात आल्या. मात्र, त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
लोककला स्पर्धा
महासंघातर्फे जिल्हास्तरीय जागरण, गोंधळ आणि भारूड या लोककलांची स्पर्धा गुरुवारी (३१ जुलै) कृष्णसुंदर लॉन्स येथे सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि उदयनराजे भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार असल्याचे दिलीप परदेशी यांनी सांगितले.