ढोले-पाटील रस्ता, संगमवाडी, हडपसर, टिळक रस्ता व धनकवडी येथे डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या अधिक असल्याचे पालिकेच्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे. जून महिन्यापासून ११ जुलैपर्यंत शहरात २४९ डेंग्यूसदृश रुग्णांची नोंद झाली आहे. यातील १५३ रुग्ण- म्हणजे ६१.४४ टक्के रुग्ण वरील पाच भागात सापडले आहेत.

या कालावधीत शहरात चाचणीद्वारे डेंग्यूरुग्ण म्हणून निश्चित झालेल्या तीस रुग्णांचीही नोंद झाली आहे. पालिकेच्या कीटक नियंत्रण विभागातर्फे जुलैमध्ये डासांची वाढ झालेली शोधण्यासाठी १ लाख ३६ हजार जागा (कंटेनर) तपासण्यात आल्या आहेत. यातील ९२९ ठिकाणी डासांची पैदास आढळली आहे. बांधकामे सुरू असलेल्या ३१० ठिकाणीही डासांची वाढ झालेली सापडल्यामुळे त्यांना नोटिसा देण्यात आले आहेत, तर दोन बांधकामांच्या ठिकाणी दंडही करण्यात आले आहेत. काही व्यावसायिक व नागरिकांनाही डासांच्या पैदाशीमुळे दंडास सामोरे जावे लागले आहे.

बोट क्लब रस्त्यावर घरांमधील शोभेच्या फ्लॉवरपॉटमध्ये, तर कोथरुडमध्ये तळघरात पाणी साठून डासांची वाढ झालेली माहिती पालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळिवंत यांनी दिली. त्या म्हणाल्या,‘‘खासगी डॉक्टरांनीही डेंग्यूसदृश रुग्णांची नोंद पालिकेकडे त्वरित केली तर आम्हाला त्या रुग्णांच्या परिसरातही ‘कंटेनर सव्‍‌र्हे’ करून डासांची पैदास शोधता येईल. आम्ही मोठय़ा रुग्णालयांकडून रुग्णांची माहिती घेत असून काही वेळा स्थानिक नगरसेवकांकडूनही माहिती मिळते. परंतु खासगी डॉक्टरांकडून दिली जाणारी रुग्णांची माहिती तोकडी आहे. डॉक्टरांच्या आम्ही बोलावलेल्या बैठकांनाही विशेष प्रतिसाद मिळत नाही. रुग्णाच्या प्रयोगशाळा तपासणीचा अहवाल काहीही आला तरी डेंग्यूसदृश व चिकुनगुनियाचे रुग्ण पालिकेला कळवणे आवश्यक आहे.’’