वैद्यकीय, अभियांत्रिकीसह चांगले वेतन आणि परदेशी जाण्याची संधी असे आकर्षण असलेले माहिती तंत्रज्ञान क्षेत्र ही प्रलोभने टाळून पुण्यातील देवव्रत उदय यादव या युवकाने वेगळा विचार करून सैन्यदलात अधिकारी होण्यास प्राधान्य दिले आहे. माहिती तंत्रज्ञानामध्ये अभियांत्रिकीची पदवी संपादन केलेल्या देवव्रत याची लेफ्टनंटपदी निवड झाली आहे.
देवव्रत यादव या मराठमोळ्या तरुणाची चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी येथील एक वर्ष कालावधीच्या प्रशिक्षण सत्रासाठी प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. देवव्रत हा जे.एन. पेटीट टेक्निकल हायस्कूलचा माजी विद्यार्थी आहे. फग्र्युसन महाविद्यालयातून बारावी झाल्यानंतर त्याने जी.एच. रायसोनी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी विशेष प्रावीण्यासह संपादन केली आहे. शिक्षण घेत असतानाच त्याने सेनादलामध्ये देशसेवा करण्याचे ध्येय निश्चित करून त्यासाठी शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमता वाढविली. त्यासाठी त्याला कर्नल (निवृत्त)वांडकर, लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) वसंत लोंढे आणि लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) महेश महाजन यांनी मार्गदर्शन केले. कम्बाइन्ड डिफेन्स सव्र्हिसेस (सी.डी.एस.) परीक्षेतील यशानंतर त्याची नोव्हेंबर २०१५ मध्ये बंगळूर येथे पुढील परीक्षा आणि वैद्यकीय चाचणीसाठी निवड झाली. चेन्नई येथील प्रशिक्षणासाठी देशातून १३७ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. एक वर्षांच्या प्रशिक्षणानंतर देवव्रत लेफ्टनंट पदावर रुजू होणार असून त्याने पहिल्याच प्रयत्नामध्ये हे यश संपादन केले आहे.