शहराच्या जुन्या हद्दीतील बांधकामांना पूर्वीप्रमाणेच दोन चटई क्षेत्र निर्देशांक (फ्लोअर स्पेस इंडेक्स- एफएसआय) द्यावा, या प्रस्तावाबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड आणि महापालिकेतील काँग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे यांच्यातील मतभेद उघड झाले आहेत. जुन्या शहरात दोन एफएसआय द्यायला शिंदे यांनी उघड विरोध केला आहे, तर छाजेड यांनी पाठिंबा दिला आहे.
शहराचा प्रारुप विकास आराखडा प्रसिद्ध करताना त्यात जुन्या हद्दीत दीड एफएसआय प्रस्तावित करण्यात आला आहे. वास्तविक, दोन एफएसआय दिला जात असताना तो दीड करण्यात आल्याचा प्रकार काँग्रेसचे प्रदेश चिटणीस, नगरसेवक संजय बालगुडे यांनी उघड केल्यानंतर ती छपाईतील चूक आहे, ती चूक प्रशासनाकडून दुरुस्त केली जाईल, असे निवेदन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले. त्यानंतर आराखडय़ावरील हरकती-सुनावणीची प्रक्रिया सुरू झाली.
आराखडय़ाच्या नियोजन समितीने पुणे बचाव समितीबरोबर दोन दिवसांपूर्वी जी चर्चा केली, त्या चर्चेतही जुन्या हद्दीत दोन एफएसआय लागू करण्याबाबत समिती स्वत:हून प्रस्ताव तयार करेल व तो पक्षनेत्यांना देईल. पक्षनेते तो प्रस्ताव मुख्य सभेपुढे ठेवतील व सभा तो प्रस्ताव पुढील महिन्यात मंजूर करेल, असे समितीचे सदस्य व काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी सांगितले होते. त्यामुळे दीड एफएसआयची चूक दुरुस्त होणार हे स्पष्ट झाले होते.
दरम्यान, विरोधी पक्षनेता व काँग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन छपाईतील चुकीच्या नावाखाली जुन्या हद्दीत दोन एफएसआय द्यायला विरोध असल्याचे सांगितले. सद्यपरिस्थितीचा अभ्यास करूनच एफएसआय बाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी करून बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे, असाही आरोप शिंदे यांनी केला.

 दोन एफएसआयचा प्रस्ताव
शहर सुधारणा समितीत मंजूर
विकास आराखडा छपाईतील चुकीमुळे जुन्या हद्दीत दीड एफएसआय दिला जात आहे. त्याऐवजी तो दोन करावा, असा प्रस्ताव शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत बधे आणि सोनम झेंडे यांनी शहर सुधारणा समितीला दिला होता. हा प्रस्ताव शुक्रवारी समितीने एकमताने मंजूर केला. अंतिम मंजुरीसाठी आता हा प्रस्ताव मुख्य सभेपुढे येईल. प्रशासनाच्या चुकीमुळे गावठाण व जुन्या हद्दीत बांधकामे करणेच शक्य होत नव्हते. त्यामुळे हा प्रस्ताव दिला होता, असे बधे यांनी सांगितले.