रंगभूमी आणि चित्रपटांतील विविध भूमिकांतून प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे ज्येष्ठ अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर यांच्याशी सहज -मनमोकळा संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या उपक्रमात शुक्रवारी (२२ मे) सायंकाळी सहा वाजता हा वेब-संवाद रंगणार आहे.

‘हसवाफसवी’ या दिलीप प्रभावळकर यांच्या नाटकातील नाना पुंजे ही व्यक्तिरेखा आजही समाजमाध्यमात पुन्हा पुन्हा पाहिली जाते आणि पोट धरधरून हसायला भाग पाडते. स्वत: प्रभावळकरांनीच लिहिलेल्या आणि त्यातील सहाही भूमिका म्हणजे त्यांच्या लेखनाचा आणि अभिनयाचा कस पाहणाऱ्या होत्या. या नाटकाला मराठी रसिकांनी भरभरून दाद दिली. परंतु प्रभावळकर तेवढय़ावरच थांबले नाहीत. वेगवेगळ्या प्रकारच्या आणि कसदार भूमिका त्यांच्या वाटय़ाला आल्या आणि त्यांनी त्याचे चीजही केले.

प्रभावळकर यांची गेल्या पाच दशकांची कारकिर्द या वेब संवादातून उलगडणार आहे. दूरदर्शनवरील चिमणराव-गुंडय़ाभाऊ ही गाजलेली मालिका, हसवा-फसवीसारखं धमाल एकल नाटय़, झपाटलेला चित्रपटातील तात्या विंचू, चौकट राजा चित्रपटातील नंदू अशा अनेक खास भूमिकांमागील गोष्टी, त्यांची लेखनाची आवड या विषयीच्या गप्पा या कार्यक्रमात होतील; तसेच मनोरंजन क्षेत्रातील त्यांचे अनुभव, पडद्यामागील किस्से ऐकता येतील. प्रभावळकर यांच्याशी नाटककार-लेखक शेखर ढवळीकर संवाद साधणार आहेत.

सहभागी होण्यासाठी..

http://tiny.cc/LS-SahajBoltaBolta-22May या लिंकवर जाऊन नोंदणी करावी. त्यानंतर आमच्याकडून तुम्हाला ईमेल आयडीवर संदेश येईल. याद्वारे २२ मे रोजी सायंकाळी सहा वाजता या वेबसंवादात सहभागी होता येईल. अधिक माहितीसाठी  https://loksatta.com या संके तस्थळाला भेट द्या.

* या उपक्रमाचे सहप्रायोजक लोकमान्य मल्टिपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे.