मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांपर्यंत तक्रारी

पिंपरी : पिंपरी पालिकेतील स्वीकृत प्रभाग सदस्यांच्या निवडीवरून भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाटय़ावर आली असून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यापर्यंत तक्रारी गेल्या आहेत.

पिंपरी पालिकेच्या कार्यक्षेत्रात आठ क्षेत्रीय कार्यालये आहेत. प्रत्येकी तीन याप्रमाणे २४ स्वीकृत प्रभाग सदस्यांची निवड गुरुवारी झाली. भाजपकडे १५० हून अधिक कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितली होती, त्यापैकी १२१ अर्ज पात्र ठरले. त्यातून २४ जणांची निवड करायची होती. या निवडीवरून भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती. पक्षातील जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, ज्यांना उमेदवारी नाकारण्यात आली, त्यांचे पुनर्वसन केले पाहिजे, अशी मागणी पक्षातून होत आहे.

निवड प्रक्रियेत आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांचा वरचष्मा राहिला. मावळ व शिरूर लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून या आमदारद्वयीकडे पाहिले जाते. त्यामुळेच त्यांना निवड प्रक्रियेत मोकळीक देण्यात आली होती. पक्षातील इतर नेत्यांनी सुचवलेली नावे यादीत समाविष्ट नसल्याने त्यांचा तिळपापड झाल्याचे दिसून आले. या सर्व पक्षांतर्गत नाराजीतून कार्यकर्त्यांचे ‘उपोषण नाटय़’ झाले. ज्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले, ते कार्यकर्ते पक्षनेते एकनाथ पवार यांचे समर्थक होते. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी शहराध्यक्ष जगताप गेले असता तेथे वादावादी झाली. त्यानंतर, संघटनमंत्री रवी अनासपुरे दाखल झाले. त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याशी त्यांचे दूरध्वनीवरून बोलणे करून दिले. उपोषण सोडा, चर्चेतून मार्ग काढू, असे आश्वासन दानवे यांनी दिल्याने कार्यकर्त्यांनी उपोषण सोडले.