डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणातील आरोपींवर वेळेत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे बजावण्यात आलेल्या ‘कारणे दाखवा’ नोटीसला पोलिसांकडून प्रतिज्ञापत्राद्वारे सोमवारी उत्तर देण्यात आले. या गुन्ह्य़ातील आरोपींचा गुन्ह्य़ात सहभाग असला, तरी आरोपपत्र दाखल करण्याइतपत पुरावा नसल्याचे पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
डॉ. दाभोलकर खून प्रकरणी अटक केलेले मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांच्यावर वेळेत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दोघांना जामीन मंजूर केला होता. या प्रकरणात आरोपींवर वेळेत का आरोपपत्र दाखल केले नाही, याबाबत तपास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानुसार, तपास अधिकाऱ्यांनी सोमवारी उत्तर दिले. अटक केलेल्या आरोपींविरुद्ध पुरावा आहे. परंतु, त्यांचे साथीदार व गुन्ह्य़ातील मुख्य सूत्रधार हे सापडलेले नसून त्यांचा तपास सुरू आहे. अटक आरोपी व इतर फरार आरोपी यांचा गुन्ह्य़ामध्ये नेमका काय सहभाग होता हे समजू शकलेले नाही. अटक आरोपींचा गुन्ह्य़ात सहभाग आहे. मात्र, आरोपपत्र दाखल करण्याइतपत पुरावा नसल्यामुळे आरोपपत्र दाखल केलेले नाही, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.