डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचा तपास गांभीर्याने केला गेला नसल्याचा आरोप करून येत्या ३१ तारखेपर्यंत तपासाबाबतचे तपशील जाहीर पोलिसांनी जाहीर करावेत, अन्यथा १ ऑगस्टपासून राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणिस डॉ. हमीद दाभोलकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.
या वेळी समितीचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख, राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील आदी उपस्थित होते.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या तपासात पुणे पोलिसांनी प्लँचेट केले असल्याच्या आरोपानंतर समितीच्या वतीने दौंड पोलीस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी लेखी तक्रार देण्यात आली आहे. मात्र, तरीही पोलिसांकडून आणि शासनाकडून पुराव्यांची मागणी केली जात आहे. स्टिंग ऑपरेशनची चित्रफीत माध्यमांतून प्रसिद्धी झाल्यानंतरही माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, पोलीस उपायुक्त रणजित अभिनकर, मनीष ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याबाबत शासनाकडून काहीही सुस्पष्ट भूमिका घेतली जात नाही. या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे का? असा प्रश्न डॉ. हमीद दाभोलकर यांनी उपस्थित केला.
या वेळी ते म्हणाले, ‘डॉ. दाभोलकरांच्या खुनाच्या तपासाबाबत पोलीस आणि शासन गंभीर नसल्याचे दिसते. प्लँचेट प्रकरणाबाबत सुरुवातीला तक्रार नाही म्हणून तपास करणे शक्य नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर तक्रार केल्यावरही या प्रकरणाबाबत शासन किंवा पोलिसांकडून काहीही पावले उचलण्यात आली नाहीत. त्यामुळे आता आंदोलनाचे पाऊल उचलावे लागणार आहे. १ ऑगस्टपासून राज्यात विविध ठिकाणी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्यात येईल.’