News Flash

कसदारपणा हाच उत्तम लेखनाचा निकष – डॉ. अरुणा ढेरे

‘लोकसत्ता’च्या ‘चतुरंग’ पुरवणीतील अभिनेत्री अमृता सुभाष यांच्या स्तंभलेखनावर आधारित ‘एक उलट.. एक सुलट’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते झाले.

| November 17, 2014 03:13 am

ललित लेखन हे वरकरणी हलकंफुलकं आणि छोटा जीव असलेले सोपे लेखन आहे असे वाटते. पण, या लेखनाच्या साधेपणातील सौंदर्य वाचकांच्या पुढय़ात ठेवण्याचे कसब लेखकाकडे असावे लागते. केवळ वाचनीयता हाच उत्तम लेखनाचा निकष नसतो. तर, वाचनीयतेपेक्षाही कसदारपणा हा अधिक महत्त्वाचा आहे, असे मत प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी रविवारी व्यक्त केले.
‘अक्षरधारा’तर्फे आयोजित ‘माय मराठी शब्दोत्सव’ ग्रंथप्रदर्शनाच्या समारोपानिमित्त ‘लोकसत्ता’च्या ‘चतुरंग’ पुरवणीतील अभिनेत्री अमृता सुभाष यांच्या स्तंभलेखनावर आधारित ‘एक उलट.. एक सुलट’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी अरुणा ढेरे बोलत होत्या. ‘लोकसत्ता’च्या फीचर एडिटर आरती कदम, राजहंस प्रकाशनच्या श्रद्धा दामले, अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर या वेळी उपस्थित होत्या.
अमृता सुभाष हिचे लेखन नितळ, खोल, थेट, गंभीर आणि अस्वस्थ करणारे आहे, असे सांगून अरुणा ढेरे म्हणाल्या,की सदर लेखन ही आनंदयात्रा बनविणे सोपी गोष्ट नाही. ललित लेखनात अनुभवांचे खासगीपण मोडून ते अनुभव सूक्ष्मतेसह उलगडावे लागतात. आपल्या अनुभवाचा आवाका ध्यानात घेत त्यातील टिकाऊ काय हे समजून घेत अभिव्यक्त व्हावे लागते. आतापर्यंत काही अभिनेत्यांनी लेखन केले असले तरी सर्वानाच शब्दांतून व्यक्त होणे साध्य झालेले नाही. ललितगद्य लेखन म्हणजे शोधाची मांडणी करीत त्यातून शहाणे होत जाण्याची प्रक्रिया असते. ती अमृताला सहजपणे साध्य झाली आहे.
लेखांचे झालेले पुस्तक हा सगळाच बेहिशेबी व्यवहार आहे. माझ्या पावतीवर जमेचा रकाना ओसंडून वाहतो आहे. पण, खर्च केले ते अनेक बेहिशेबी हातांनी मला भरभरून दिले आहे, असे मनोगत अमृता सुभाष यांनी व्यक्त केले. उत्तरार्धात ज्योती सुभाष, अमृता सुभाष आणि पर्ण पेठे यांनी पुस्तकातील निवडक भागाचे अभिवाचन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2014 3:13 am

Web Title: dr lagu publishes book of amruta subhash
Next Stories
1 राष्ट्रवादीत मोठे फेरबदल; अजित पवारांचे संकेत
2 किती वर्षे चांगले काम करते यावर हे सरकार टिकेल – अजित पवार
3 राज्यभरातील पावसामुळे पिकांना थोडासा दिलासा!
Just Now!
X