महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोघांची नार्को चाचणी करण्याची परवानगी मिळावी यासाठी पोलिसांनी न्यायालयामध्ये अर्ज केला आहे. मुंब्रा पोलिसांनी जप्त केलेले पिस्तूल ताब्यात मिळावे आणि आरोपींची ओळख परेड करण्यासाठीही पोलिसांनी अर्ज केला आहे. दरम्यान, या दोघांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
मनीष रामविलास नागोरी ऊर्फ मन्या ऊर्फ राजूभाई (वय २४) आणि विकास रामअवतार खंडेलवाल (वय २४, दोघेही रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) या दोघांना डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणामध्ये २० जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना मंगळवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. शेख यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.
मुंब्रा पोलिसांनी विकास खंडेलवाल याच्याकडून पिस्तूल जप्त केले होते. ७.६५ एएम कॅलिबरचे हे पिस्तूल आणि नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी वापरलेले पिस्तूल एकच असल्याचे बॅलेस्टिक अहवालामध्ये स्पष्ट झाले आहे. खंडेलवाल याला हे पिस्तूल मनीष नागोरी यानेच दिले असल्याचे निष्पन्न झाले असून तशी कबुलीही नागोरी याने दिली आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. हे दोघेही तपासाला सहकार्य करीत नाहीत. त्याचप्रमाणे ते दिशाभूल करीत असल्याने त्यांची नार्को चाचणी करण्याची परवानगी मिळावी असे पोलिसांनी अर्जात नमूद केले आहे. मुंब्रा पोलिसांनी जप्त केलेले पिस्तूल तपासासाठी ताब्यात मिळावे आणि आरोपींची ओळख परेड करण्याची परवानगी मिळावी असेही पोलिसांनी अर्जामध्ये म्हटले आहे.
दरम्यान, या दोघांना जामीन मिळावा अशी मागणी बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. बी. ए. अलूर यांनी केली आहे. पुढील सुनावणीमध्ये दोन्ही पक्ष आपली बाजू मांडणार आहेत. नागोरी आणि खंडेलवाल या दोघांना न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.