News Flash

ई-बस पीएमपीच्या ताफ्यात, उद्घाटन मात्र लांबणीवर

मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच त्याचे उद्घाटन करण्यासाठी मुहूर्त लांबविण्यात आल्याचीही चर्चा भाजपच्या वर्तुळात आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच उद्घाटन करण्यासाठी मुहूर्त लांबविल्याची भाजपच्या वर्तुळात चर्चा 

पीएमपीच्या ताफ्यातील अपुऱ्या गाडय़ांच्या पाश्र्वभूमीवर पंचवीस ईलेक्ट्रिकल बस (ई-बस) घेण्यासाठी पीएमपीने प्रशासनाने घाईगडबडीत ही प्रक्रिया पूर्ण केली आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या गाडय़ा रस्त्यावर धावतील, अशी घोषणाही सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली. मात्र गाडय़ा ताफ्यात येऊनही उद्घाटन लांबणीवर पडले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या गाडय़ांचे उद्घाटन करण्याचे नियोजन भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले होते.  मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच त्याचे उद्घाटन करण्यासाठी मुहूर्त लांबविण्यात आल्याचीही चर्चा भाजपच्या वर्तुळात आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत ५०० गाडय़ा खरेदी करण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १५० तर दुसऱ्या टप्प्यात ३५० गाडय़ांची खरेदी करण्यास पीएमपीच्या संचालक मंडळाने मान्यता दिली होती.

पहिल्या टप्प्यातील १५० गाडय़ांमध्ये १२ मीटर लांबीच्या १२५ आणि नऊ मीटर लांबीच्या २५ गाडय़ांची खरेदी भाडेतत्त्वावर करण्यात येणार आहे. नऊ मीटर लांबीच्या गाडय़ा भाडेकराराने घेण्यासाठी राबवलेली निविदा प्रक्रियाही वादग्रस्त ठरली होती. गाडय़ांची अपुरी संख्या लक्षात घेता ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात आल्याचा दावा करीत २६ जानेवारी रोजी २५ गाडय़ा येतील, अशी घोषणा महापौर मुक्ता टिळक यांनी केली होती.

२५ गाडय़ा दाखल झाल्या आहेत मात्र प्रादेशिक परिवहन  विभागाकडे कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सध्या सुरू आहे. येत्या तीन ते चार दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असा दावा पीएमपीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला.

ई-बससाठी सात मार्ग निश्चित

ई-बस संचलनात येण्याचा मुहूर्त लांबणीवर पडला असला तरी कोणत्या मार्गावर या गाडय़ा संचलनात राहतील याचे नियोजन करण्यात आले आहे. यापूर्वी गाडय़ांची चाचणी घेण्यात आली होती. पुण्यातील चार आणि पिंपरी-चिंचवड शहरातील तीन मार्ग यासाठी निश्चित करण्यात येणार आहेत. एकूण २५ गाडय़ांपैकी १५ गाडय़ा पुण्यात, तर १० गाडय़ा पिंपरी-चिंचवड शहरात धावणार आहेत. दोन्ही शहरात चार्जिग स्टेशन उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुण्यासाठी भेकराईनगर आगार तर पिंपरी-चिंचवडसाठी निगडी आगारात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ई-बस पीएमपीच्या ताफ्यात आल्या आहेत. त्या मार्गावर आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत उद्घाटनाचा कार्यक्रम होणे अपेक्षित आहे.

– सिद्धार्थ शिरोळे, संचालक, नगरसेवक, पीएमपी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 12:45 am

Web Title: e bus pmps concert however prolonged the inauguration
Next Stories
1 पुण्यात पारपत्रधारकांची वाढती संख्या
2 पुण्यात झोपडपट्टीला आग, १५ पेक्षा जास्त घरे जळून खाक
3 ‘रेडीरेकनर’च्या दरात यंदा वाढ नको
Just Now!
X