News Flash

पुण्याच्या निवडणुकीची दोरी महिला अधिकाऱ्यांच्या हाती!

पुणे जिल्ह्य़ातील २१ मतदारसंघांमधील निवडणूक सुरळीत पार पाडण्याची प्रमुख जबाबदारी जिल्हा प्रशासनातील सुमारे बारा महिला अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे.

| September 30, 2014 03:20 am

यंदाची विधानसभा निवडणूक पुण्याच्या दृष्टीने वैशिष्टय़पूर्ण ठरली आहे. पुणे जिल्ह्य़ातील २१ मतदारसंघांमधील निवडणूक सुरळीत पार पाडण्याची प्रमुख जबाबदारी जिल्हा प्रशासनातील सुमारे बारा महिला अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे. निवडणुकीच्या व्यवस्थापनासाठीचा एक खिडकी कक्ष, पेड न्यूज कक्ष, जाहिरात कक्ष, प्रसारमाध्यम कक्ष, प्रशिक्षण कक्ष, निवडणूक निरीक्षक व्यवस्थापन आदी प्रमुख कक्षांची जबाबदारी महिलांवर आहे. त्याचबरोबर तीन मतदारसंघांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणूनही महिलाच आहेत. या महिलांमध्ये प्रामुख्याने उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेकडून सर्व आवश्यक बाबींची तयारी पूर्ण करण्यात आली होती. निवडणुकीशी निगडित अनेक विषय आणि व्यवस्थापनासाठी निवडणूक शाखेला इतर विभागांच्या अधिकाऱ्यांची सेवा घ्यावी लागते. त्याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी या नात्याने जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आदेश काढले आहेत. त्यानुसार उपजिल्हाधिकारी दर्जाच्या सुमारे बारा महिला अधिकाऱ्यांकडे निवडणुकीची प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे.
निवडणुकीच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांप्रमाणेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी हे पद महत्त्वाचे असते. सध्या या पदाची जबाबदारी समीक्षा चंद्राकर-गोकुळे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांची अलीकडेच या पदावर बदली झाली आहे. त्यांनी थोडय़ाच काळात निवडणुकांबाबत चांगले नियोजन केले आहे. जिल्ह्य़ातील तीन मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी ही जबाबदारी महिलांकडे आहे. त्यात खडकवासला मतदारसंघासाठी स्नेहल बग्रे, पर्वती मतदारसंघासाठी ज्योती कदम आणि इंदापूर मतदारसंघासाठी आरती भोसले यांची नेमणूक करण्यात आली आहे.
निवडणूक यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विविध कक्षांचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करावे लागते. त्यातील प्रमुख कक्षांची जबाबदारीसुद्धा महिलाच पार पाडत आहेत. निवडणूक प्रचारासाठी विविध परवानग्या देण्यासाठी एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याच्या प्रमुख अस्मिता मोरे आहेत. पेड न्यूज कक्षाची जबाबदारी विजया पांगारकर यांच्याकडे आहे. जाहिरात कक्षाच्या प्रमुखपदी नीलिमा धायगुडे या आहेत. प्रसारमाध्यम कक्ष प्रमुखपदी डॉ. जयश्री कटारे आहेत.  रेश्मा माळी यांच्याकडे कम्युनिकेशन प्लॅनची जबाबदारी आहे. या काळात विविध प्रकारचे प्रशिक्षण द्यावे लागते. या विभागाची जबाबदारी ज्योत्स्ना हिरमुखे यांच्याकडे आहे, तर निवडणूक निरीक्षक व्यवस्थापनाची जबाबदारी नना बोंदार्डे या पेलत आहेत.
याचबरोबर सीमा होळकर, सुरेखा माने, गीतांजली शिर्के, मोहिनी चव्हाण, सुनीता आसवले, सुचित्रा पाटील, रमा जोशी, जयश्री माळी, वैशाली राजमाने, अर्चना शेटे आदी. तहसीलदार दर्जाच्या अधिकारीही या प्रक्रियेत कार्यरत आहेत.
‘पुरुषांच्या तुलनेत दीडपट कार्यक्षम’
‘‘पुणे जिल्ह्य़ातील निवडणुकीची जबाबदारी पार पाडणाऱ्या महिला अधिकारी अत्यंत उत्तम काम करत आहेत. कोणत्याही पुरूष अधिकाऱ्यापेक्षा दीडपट जास्त काम करत आहेत. त्या आपले कामकाज पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार रात्री उशिरापर्यंत थांबतात. आजारी असतानाही रोज येतात आणि आपली जबाबदारी पार पाडतात. कामामध्ये कोणतीही मर्यादा न बाळगता आपली जबाबदारी पेलत आहेत.’’
सौरभ राव (जिल्हाधिकारी)

‘‘निवडणुकीच्या कामाचा वेगळाच अनुभव असतो. काम अतिशय संवेदनशील आणि तणावाचे असले तरी आम्ही या कामाचा आनंद लुटतो.’’
नीलिमा धायगुडे (जाहिरात कक्षाच्या प्रमुख)
अस्मिता मोरे  (एक खिडकी कक्षाच्या प्रमुख)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2014 3:20 am

Web Title: election women officers responsibility
टॅग : Election
Next Stories
1 कॉटनचा साधेपणा ते लिननची ‘शो’गिरी
2 पर्वतीत आबा बागूल यांची बंडखोरी कायम
3 विधानसभेसाठी शहरी भागात मतदानाचा टक्का वाढविण्याचे आव्हान!
Just Now!
X