मैत्रिणीबरोबर शाळेत जात असलेल्या मुलीची भररस्त्यात छेड  काढणाऱ्या एका तरुणाला विशेष न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरी आणि पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

विशेष न्यायाधीश व्ही. के. कदम यांनी या खटल्याचा निकाल दिला आहे. सागर गोरख काकडे (वय २१,रा. वैदुवाडी, हडपसर) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. याबाबत एका चौदावर्षीय शाळकरी मुलीने लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तीन वर्षांपूर्वी शाळकरी मुलगी आणि तिची मैत्रीण सकाळी लष्कर भागातून जात होत्या. शाळेत जात असलेल्या मुलीची काक डेने भररस्त्यात छेड काढली होती. याबाबत मुलीने पोलिसांकडे तक्रार दिली होती. लष्कर पोलिसांकडून याप्रकरणी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात सहाय्यक जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. शुभांगी देशमुख यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस शिपाई योगेश होले यांनी सहाय्य केले.

न्यायालयाने साक्ष तसेच पुरावे ग्राह्य़ धरून काकडेला तीन वर्ष सक्तमजुरी आणि पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी दहा हजार रुपये पीडीत मुलीला देण्याचे आदेश न्यायालयाने निकालात दिले आहेत. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी सहा महिने शिक्षेची तरतूद न्यायालयाने केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सपना सोळंके यांनी याप्रकरणाचा तपास करून आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते.