पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील ‘कॅथलॅब’ च्या कारभाराची चौकशी करावी, तसेच पॅथॉलॉजी लॅब, मेडिकल व सिटी स्कॅन विभागासाठी नव्याने निविदा काढण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीस आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित नव्हते. गेल्या आठवडय़ात शिवसेनेच्या आशा शेंडगे यांनी वैद्यकीय विभागातील विशेषत: ‘रुबी अलकेअर’ च्या दर्जाचे वाभाडे काढले होते. त्यावर आज पुन्हा चर्चा झाली. पालिकेने कोटय़वधी रुपये खर्च करून उभारलेल्या कॅथलॅबला नऊ लाख रुपये वार्षिक भाडे आहे. ते अतिशय कमी आहे. पालिकेला तोटय़ात घालून अनेकांनी आपले उखळ पांढरे केले आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यानुसार, पॅथॉलॉजी लॅब, मेडिकल व सिटी स्कॅनच्या कामाच्या पुन्हा निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘रुबी अलकेअर’ मध्ये काढलेले ‘सिटी स्कॅन’ व ‘एमआरआय’ चे रिपोर्ट बाहेर निकृष्ट मानले जात असल्याच्या आरोपाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल रॉय यांनी खंडन केले. सांगवीत सव्र्हे क्रमांक २६ येथे उद्यान विकसित करण्यासाठी एक कोटी १९ लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.