पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्या ४२ वर्षांच्या होत्या. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रविवारी रात्री खराडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुणे महानगरपालिकेत २०१२ मध्ये त्या पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. सप्टेंबर २०१३ ते सप्टेंबर २०१४ या कालावधीत त्यांनी पुणे महानगरपालिकेचे महापौरपद भूषविले होते. दुसऱ्यांदा नगरसेविका झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना महापौरपद दिले होते. विशेष म्हणजे त्यांनी अगदी कमी कालावधीत आपल्या कामाचा करिष्मा दाखवून दिला होता.
कोद्रे कायम हसतमुख असायच्या याबरोबरच सभागृहात विविध विषय मांडणे आणि शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्याचे काम त्यांनी अतिशय चांगल्यारितीने सांभाळले होते. अनेक सामाजिक कामांमध्येही त्यांचा पुढाकार कायम होता. महापालिकेमध्ये महिला नगरसेवकांचे संघटन करण्याचे काम त्यांनी केले होते. त्यांच्या अचानक निधनाने महापालिकेतील राजकीय व प्रशासनालाही धक्का बसला आहे. सोमवारी सकाळपासून त्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत होत्या. मात्र अचानक त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यातच त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. सोमवारी सायंकाळी सहा वाजता मुंढवा स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 18, 2017 3:26 pm