महापौर चषक क्रीडा स्पर्धामधील उधळपट्टीवर टीका झाल्यानंतर या खर्चाची खुद्द महापौरांनीच छाननी केली असून स्पर्धावर तब्बल एक कोटी तीन लाख वीस हजार रुपये जादा खर्च केले जाणार असल्याची वस्तुस्थिती या छाननीत उघड झाली आहे. या सर्व जादा खर्चात कपात करण्याचे आदेश महापौरांनी दिले असून उधळपट्टीलाही ब्रेक लावला आहे.
महापालिकेतर्फे महापौर चषकांतर्गत सव्वीस क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धासाठी तीन कोटी २९ लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र या खर्चावर टीका झाल्यानंतर खुद्द महापौर दत्तात्रय धनकवडे यांनीच या सर्व खर्चाची छाननी केली. तसेच खर्चाबाबत आलेल्या प्रस्तावांचीही बारकाईने शहानिशा केली. छाननीत खर्चाचे आकडे वाढवून सादर झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी प्रत्येक स्पर्धेतील प्रत्येक क्रीडा प्रकारासाठी सादर झालेला खर्चाचा प्रस्ताव तसेच मंजूर झालेली रक्कम यांची तपासणी केली. स्पर्धामधील रोख बक्षिसांसाठी मंजूर झालेली रक्कम कमी न करता अन्य उधळपट्टीवर आता नियंत्रण आणण्यात आले आहे.
महापौरांनी स्पर्धावर होणाऱ्या खर्चाची छाननी केली नसती, तर मंजूर झालेल्या ठरावानुसार या स्पर्धावर तीन कोटी २९ लाखांपर्यंत खर्च झाला असता. मात्र खर्चात कपात केल्यामुळे आता दोन कोटी २६ लाख रुपये खर्च करून या स्पर्धा पार पडतील. त्यामुळे एक कोटी तीन लाखांची बचत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंडप, वीज, ध्वनिवर्धक, व्हिडीओ शूटिंग, छायाचित्रे, भोजन, सन्मानचिन्ह आदी अनेक प्रकारच्या खर्चात कपात करण्यात आली आहे. तसेच वूशू, कुडो, कुराश, वकिलांबरोबर क्रिकेटचा सामना यांचे आयोजन करू नये, असाही निर्णय घेण्यात आला आहे.

महापौर चषक क्रीडा स्पर्धामध्ये यापुढे तीन क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केल्या जातील. तसेच इतर स्पर्धा जिल्हास्तरीय असतील आणि या स्पर्धामध्ये निवड चाचणी स्पर्धाना प्राधान्य देण्यात येईल. संयोजक संस्थांकडून खर्चाचे जे प्रस्ताव आले होते ते तसेच्या तसे मंजूर करण्यात आले होते. त्यामुळे खर्च अधिक झाला असता. त्यात कपात करण्यात आली आहे.
– महापौर दत्तात्रय धनकवडे