बनावट कागदपत्रांच्या आधारे क्रेडिट कार्ड काढून फसवणूक करणाऱ्या भामटय़ांना सायबर गुन्हे शाखेने पकडले. त्यांच्याकडून बनावट पॅनकार्ड, बनावट आधारकार्ड,कर्ज प्रकरणांचे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहे. भामटय़ांनी अनेक बँकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे.

भैरवनाथ बाबुराव साळुंके (वय ३४, रा. धायरकर वस्ती, मुंढवा) आणि पंकज अशोक टाक (वय ३३, रा. स्टार सिटी, डुडळगांव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पिंपळे निलख भागातील रहिवासी रोहित पिसाळ  (वय ३१) हे कोटक महिंद्र बँकेचे खातेदार आहेत. त्यांना गेल्या महिन्यात २२ ऑगस्ट रोजी बँकेतून क्रेडिट कार्डची थकबाकी असल्याचा दूरध्वनी आला. त्यानंतर पिसाळ यांनी बँकेत जाऊन खातरजमा केली. पिसाळ यांनी क्रेडिट कार्ड धारक नसल्याचे सांगितले. त्यानंतर पिसाळ यांच्या नावावर बँकेने क्रेडिट कार्ड दिले गेले नसल्याचे सांगितले. त्यानंतर बँकेने पिसाळ यांच्या नावाने काढण्यात आलेल्या क्रेडिट कार्डच्या कागदपत्रांची पडताळणी केली. तेव्हा पिसाळ यांच्या नावाने बनावट कागदपत्रे सादर करून क्रेडिट कार्ड काढण्यात आल्याचे निदर्शनास आले. पिसाळ यांच्या नावाने काढण्यात आलेल्या बनावट क्रेडिट कार्डचा वापर करुन त्याद्वारे ७५ हजार रुपयांची खरेदी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या प्रक रणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर गुन्हे शाखेने या गुन्ह्य़ाचा समांतर तपास सुरू केला. आरोपी साळुंके आणि टाक यांनी इंडसलँड बँक, बँक ऑफ इंडिया, एसपायर बँक या बँकेत बनावट नावाने खाते काढली होती. त्याद्वारे त्यांनी क्रेडिट कार्ड मिळविली होती. सन २०१३ मध्ये दोघा आरोपींना मुंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या क्रेडिट कार्ड फसवणुकीच्या गुन्ह्य़ात अटक करण्यात आली होती. पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँकांची खातेपुस्तिका, बनावट पॅनकार्ड, कर्जप्रकरणांचे बनावट दस्तऐवज, आधारकार्ड अशी कागदपत्रे जप्त क रण्यात आली.

सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, सहायक आयुक्त अरुण वालतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, दीपक लगड, सहायक निरीक्षक सचिन गवते, सागर पानमंद, अस्लम अत्तार, अजित कुऱ्हे, अमित अवचरे, राजकुमार जाबा, सागर वाघमारे, नितेश शेलार, बाळासाहेब कराळे, राजू भिसे यांनी ही कारवाई केली.

या आधीही अटक

आरोपी साळुंके आणि टाक यांनी इंडसलँड बँक, बँक ऑफ इंडिया, एसपायर बँक या बँकेत बनावट नावाने खाते काढली होती. सन २०१३ मध्ये दोघा आरोपींना मुंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या क्रेडिट कार्ड फसवणुकीच्या गुन्ह्य़ात अटक करण्यात आली होती.

पोलीस असल्याच्या बतावणीने महिलेला गंडा

दिल्ली पोलीस दलातून अधिकारी बोलत असल्याची बतावणी करून पतीच्या नावाने अटक वॉरंट काढल्याची धमकी देऊन एकाने महिलेला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सोमनाथ असे नाव सांगणारा भामटा आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सरिता जैन (वय ४९, रा. वडगाव शेरी) यांनी या संदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जैन घरी असताना सोमनाथ असे नाव सांगणाऱ्या एकाने त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. दिल्ली पोलीस दलातून बोलत असल्याची बतावणी केली. ‘तुमच्या घरातील दूरध्वनीचे बिल थक ले आहे. पतीच्या नावाने दिल्ली पोलिसांकडून अटक वॉरंट काढण्यात आले आहे,’ अशी बतावणी सोमनाथने केली. न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे तातडीने थकीत बिलाची रक्कम ८७ हजार ५६० रुपये आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठी लागणारी रक्कम अशी १ लाख २० हजारांची रक्कम तातडीने भरावी लागेल, असे त्याने जैन यांना सांगितले.

घाबरलेल्या जैन यांनी त्याची शहानिशा केली नाही. भामटय़ाने सांगितलेल्या बँक खात्यावर त्यांनी १ लाख २० हजार रुपये भरले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर जैन यांनी पोलिसांक डे तक्रार केली. पोलीस उपनिरीक्षक जगदाळे तपास करत आहेत.

 

मुळशीत खून करणारा गजाआड

मुळशी तालुक्यात एकाच्या डोक्यात दगड घालून खून करून पसार झालेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली.

तुकाराम विठ्ठल बरवे (वय ४६, रा. कोळवण, ता. मुळशी)असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी शंकर लहाणू काटकर (वय १९, रा. गणेवाडी, कातकरी वस्ती, ता. मुळशी) याला अटक करण्यात आली. बरवे यांची पत्नी संगीता (वय ४०) यांनी यासंदर्भात पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मंगळवारी कोळवण येथील गणेवाडी भागात अत्रे यांच्या बंगल्यानजीक बरवे यांचा मृतदेह सापडला होता. बरवे यांच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी या गुन्हय़ाचा तपास सुरू केला तेव्हा काटकरने किरकोळ वादातून बरवेंचा खून केल्याचे निष्पन्न झाले. पसार झालेल्या काटकरला पोलिसांनी पकडले.

काटकरला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र अद्याप खुनामागचे कारण स्पष्ट झाले नाही. त्याच्या साथीदारांचा शोध घ्यायचा आहे. त्याला पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती सरकारी वकील प्रभाकर तरंगे यांनी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. सी. खैरनार यांनी काटकरला १२ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.