नवी सांगवी परिसरात आपल्याच गोठ्यातील अवघ्या १५ दिवसांच्या वासराला दोरी आणि हाताने अमानुष मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेप्रकरणी प्राणी मित्र स्वप्नील पुष्कराज जोशी (वय २५) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, बाळासाहेब बाजीराव वाळुंज (वय ६२) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीने आपल्याच मालकीच्या गायीच्या अवघ्या १५ दिवसांच्या वासराला दोरी आणि हाताने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्राणीमित्र स्वप्नील जोशी यांनी याबाबत सविस्तर माहिती काढून मारहाण करणाऱ्या बाळासाहेब वाळुंज यांच्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन आणि संबंधित व्हिडिओवरुन वाळुंज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राणीमित्र जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, २० ते २२ जुलै दरम्यान रात्री साडेनऊच्या सुमारास गोठ्यात वासराला बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे मारहाण झालेल्या वासराला पुन्हा मूळ मालकाच्या ताब्यात देऊ नये, अशी मागणीही तक्रारीत करण्यात आल्याचे स्वप्नील जोशी यांनी लोकसत्ता डॉट कॉमशी बोलतना सांगितले.
या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश माने करीत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 23, 2020 4:40 pm