स्मार्ट सिटीत ग्राहकाच्या फरफटीबाबत संताप

पुणे : मागेल त्याला वीजजोड.. पैसे भरताच विजेचा लख्ख प्रकाश आणि ग्राहकाभिमुख सेवेचा ठेंभा मिरविला जात असतानाच स्मार्ट सिटी योजनेत समावेश असलेल्या बालेवाडी भागात वीजजोड मिळविण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून एका महिलेची तीन महिन्यांपासून फरफट करण्यात आली. सजग नागरिक मंचच्या माध्यमातून ‘लोकसत्ता’ने हा प्रकार ठळकपणे समोर आणल्यानंतर मात्र अधिकाऱ्यांची भाषा बदलली आणि कोणत्याही अटीशिवाय  संबंधित महिलेच्या नव्या इमारतीत मीटर बसवून वीजपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, या एका उदाहरणामधून ग्राहकांना दिली जाणारी वागणूक समोर आल्याने त्याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

बालेवाडी भागातील अपर्णा करमरकर यांच्या बाबतीत हा प्रकार घडला. करमरकर यांची बालेवाडी भागात तीन मजल्यांची नवी इमारत असल्याने प्रत्येक मजल्यासाठी एक यानुसार तीन मीटर त्यांना हवे होते. वीजजोड मिळविण्यासाठी अत्यंत सोपी पद्धत असल्याचे त्यांनी वाचले होते. तोच विचार डोक्यात घेऊन त्यांनी औंध कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह २७ एप्रिलला अर्ज सादर केला. त्यानुसार बाणेर कार्यालयातून सात दिवसांत जागेची पाहणी आवश्यक असताना आठ दिवस उलटूनही कोणी न आल्याने त्यांनी स्वत:च अर्जाची प्रत बाणेर कार्यालयात दिली. त्यानंतर त्यांच्या सातत्याने कार्यालयातील फेऱ्या सुरू झाल्या. कोटेशननुसार त्यांनी रक्कमही भरली. मात्र, महिन्यानंतर त्यांना एकच मीटर मंजूर करण्यात आला. वीजजोड घेण्यासाठी लावणारी वीजवाहिनी टाकण्याचा खर्चही करमरकर यांनीच करण्याचे सांगण्यात आले.

वीजवाहिनी महावितरणने टाकायची असते, असे सांगितल्यानंतर ‘उगाचच नियमावर कशाला बोट ठेवता’ असेही त्यांना सुनावण्यात आले. त्यानंतर वाढीव कोटेशन भरून महावितरणच्या कार्यवाहीची त्यांनी वाट पाहिली. मात्र, त्यानंतर पंधरा ते वीस दिवस काहीच हालचाल झाली नाही. ‘कुणी वीज देता का वीज’ अशी अवस्था झालेल्या करमरकर यांनी हतबल होऊन अखेर याबाबत सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांच्याशी संपर्क साधला. या संपूर्ण प्रकरणात अधिकाऱ्यांची मनमानी दिसून येत होती. त्याचप्रमाणे वीज आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे ‘लोकसत्ता’ने याबाबत ठळक वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर मात्र करमरकरांना अधिकाऱ्यांकडून सौजन्याचे दूरध्वनी सुरू झाले. वीजवाहिनी टाकून देण्याची मनमानी अटही रद्द झाली आणि युद्धपातळीवर कामे पूर्ण करून अखेर करमरकर यांच्या इमारतीत नुकतेच तीन मीटर बसवून वीजपुरवठाही सुरू करण्यात आला.