तरुणाईचे भावविश्व सकल कलांसह आविष्कृत होणाऱ्या फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने (सीओईपी) करंडकावर आपली नाममुद्रा कोरली. विश्वकर्मा इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (व्हीआयआयटी) ने द्वितीय, तर स. प. महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकाविला.
सामाजिक आर्थिक विकास संस्था आणि स्वप्नपूर्ती निर्मित फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेची अंतिम फेरी गुरुवारी अण्णा भाऊ साठे नाटय़गृह येथे पार पडली. प्राथमिक फेरीत सहभागी झालेल्या २८ संघांमधून नऊ महाविद्यालयाच्या संघांनी अंतिम फेरी गाठली होती. ‘सीओईपी’ने सादर केलेला ‘गुलिस्ता’ हा आविष्कार प्रथम क्रमांकासह करंडकाचा मानकरी ठरला. महाविद्यालयाचे नाव पुकारताच ‘आव्वाज कुणाचा’ या घोषणांनी नाटय़गृह दणाणून गेले. ‘व्हीआयआयटी’च्या ‘जयप्रभा’ने दुसरा आणि स. प. महाविद्यालयाच्या ‘नेव्हर एंिडग रेस’ने तिसरा क्रमांक मिळविला. याखेरीज एमआयटी (असा मी), मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय (जातकवेणा), सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय (आठ), ट्रिनिटी अभियांत्रिकी महाविद्यालय (डब्बा गुल), पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्प्युटर सायन्स (अव्यक्त) आणि विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय (अगाध) या संघांनी कलाविष्कार सादर केला.
उमेश कुलकर्णी, संदीप खरे, महेश काळे, अमित फाळके, प्रसाद वनारसे, हृषीकेश देशपांडे, क्षितिज पटवर्धन, केदार पंडित, श्रुती मराठे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. बालगंधर्व रंगमंदिर येथे बुधवारी (२ मार्च) सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम होणार आहे. विविध गुणदर्शन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना वैयक्तिक पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.