पिंपरी चिंचवड परिसरात मौजेसाठी दुचाक्या चोरणाऱ्यांना निगडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून तब्बल चौदा दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत, त्याचबरोबर दुसऱ्या एका घटनेत पाच मोबाईलसह चोरांना ताब्यात घेतले आहे. असा एकूण ६ लाख ३० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष मदनराव देशमुख (वय २३, जाधववाडी, चिखली) या तरुणाला पिंपरी चिंचवड परिसरातील दुचाक्या चोरल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने तब्बल बारा दुचाकी चोरल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे केवळ मौजेसाठी दुचाकी चोरत असल्याचे त्यानी सांगितले आहे. ज्याठिकाणी चोरलेल्या दुचाकीचे पेट्रोल संपेल त्याच ठिकाणी ती सोडून दुसरी दुचाकी चोरण्यासाठी संतोष सज्ज असायचा. या प्रकरणी त्याच्याकडून दहा गुन्हे उघड झाले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी ही माहीती दिली.

तर, दुसऱ्या एका घटनेत गौतम सरोदे (वय २०) आणि मनोज सरोदे (वय १९) दोघेही रा. दळवीनगर, निगडी यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पाच मोबाईल आणि मोबाईल चोरण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून पाच गुन्हे उघड झाले आहेत, तसेच सलीम शेख याला घरफोडीप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे.

[jwplayer qSkEaoqJ]