पोलिसांचे स्पष्टीकरण; पथकांकडूनही विविध तक्रारींचा सूर

गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल-ताशा पथकाला पंचवीसपेक्षा जास्त ढोल वादकांचा समावेश करता येणार नसल्याचे स्पष्टीकरण पोलिसांच्या वतीने बुधवारी ढोल-ताशा पथकांच्या बैठकीत केले गेले. पथकाच्या पदाधिकाऱ्यांनीही बैठकीत विविध तक्रारी मांडल्या. नागरिकांच्या तक्रारीवरून पोलीस सत्यता न पडताळताच पथकांवर गुन्हे

दाखल करीत असून, गुन्ह्य़ाच्या भीतीने वादकांची संख्या घटक आहे. त्यामुळे पोलिसांनी तक्रार दाखल करताना पडताळणी करावी, अशी मागणी पथकांच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर परिमंडल एकमधील गणेश मंडळे, पोलीस व ढोल-ताशा पथकांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक टिळक वाडय़ातील लोकमान्य सभागृहात झाली. परिमंडल एकचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, वाहतूक पोलीस आयुक्त डॉ. प्रवीण मुंडे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे, प्रवीण कुलकर्णी, मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात तसेच डॉ. मिलिंद भोई, शिरीष मोहिते, दत्ता सागरे आदी बैठकीला उपस्थित होते.

ढोल-ताशा पथकांच्या संख्येचा विचार करता पथकामध्ये पंचवीसपेक्षा अधिक ढोल वादकांचा समावेश करता येणार नाही. हा निर्णय अंतिम आहे. त्याचे पालन पथकांनी करावे. त्याचप्रमाणे सराव करताना आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन हिरेमठ यांनी केले.

ढोल-ताशा पथकाच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्या तक्रारी मांडल्या. ढोल-ताशा पथकात वादन करणारे तरुण उच्चशिक्षित आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यास शिक्षण, नोकरी व पारपत्र काढण्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे पथकात येणाऱ्यांची संख्या घटत आहे. दहा दिवसांच्या आनंद सोहळ्यासाठी तरुण एकत्र येतात. त्यामुळे पोलिसांनी पथकाला सहकार्य करावे, अशी मागणी पथकाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी सर्वच भागात समान बंदोबस्त द्यावा. गणेश मंडळांच्या परवान्यासाठी एक खिडकी योजना राबवावी. गर्दीत महिलांच्या छेडछाडीचे प्रकार रोखावेत. पोलिसांनी मंडळांमध्ये भेदभाव करू नये. आपण म्हणू तोच कायदा, अशा पद्धतीने पोलीस अधिकाऱ्यांची वागणूक नको. ढोल-ताशांच्या पथकातील वादकांच्या संख्येवर र्निबध घालू नयेत

आदी मागण्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या. सोडविण्यासारख्या अडचणी निश्चितच सोडविल्या जातील, असे आश्वासन हिरेमठ यांनी दिले.