जर्मनीतील ग्रिप्स रंगभूमी चळवळ आणि पुण्यातील महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्यातील ‘ऑथर प्रोजेक्ट’ या आदानप्रदान संकल्पनेअंतर्गत ‘डेर गेस्ट इस्ट गॉट’ (अर्थात अतिथी देवो भव) या जर्मन नाटकाचे पुणे आणि बंगळुरू येथे प्रत्येकी दोन प्रयोग होत आहेत. ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे मंगळवारी (२ जून) आणि बुधवारी (३ जून) तर, ५ आणि ६ जून रोजी बंगळुरू येथेही या नाटकाचे प्रयोग होणार आहेत.
बालनाटय़ आणि युवानाटय़ाचा वेगळा विचार करून सादरीकरण हे वैशिष्टय़ असलेली ग्रिप्स रंगभूमी चळवळ भारतामध्ये १९८६ साली थिएटर अॅकॅडमी संस्थेने आणली. प्रारंभी ग्रिप्सची नाटके भाषांतरित करण्यात आली. परंतु, १९९६ पासून संपूर्णपणे स्वतंत्र, इथल्या विषयांवरील नाटके महाराष्ट्र कल्चरल सेंटरने सादर केली. या नाटकांचे अन्य भाषांमध्येही प्रयोग झाले. विविध कार्यशाळा, चर्चासत्रे आयोजित करण्यात आली. २०११ मध्ये भारतातील ग्रिप्स चळवळीला २५ वर्षे पूर्ण झाली त्यावेळी आदानप्रदानाचा प्रयत्न व्हायला हवा अशी कल्पना पुढे आली. दोन्ही देशांतील लेखकांनी मिळून एक संहिता लिहून त्याचे प्रयोग मराठी आणि जर्मन या दोन्ही भाषेत व्हावेत यावर एकमत झाले.
‘गोएथे इन्स्स्टिटय़ूट’ या मातृसंस्थेच्या मॅक्समुलर भवन या संस्थेने भारतातील ग्रिप्स चळवळीला भक्कम पाठिंबा देत ऑथर प्रोजेक्टची संकल्पना उचलून धरली. जर्मनीतील नाटककार लुट्झ ह्य़ुबनर आणि मराठीतील श्रीरंग गोडबोले व विभावरी देशपांडे या तिघांनी एका संहितेचे एकत्रित लेखन केले. मराठीमध्ये ‘डू अँड मी’ (तू आणि मी) तर, जर्मनमध्ये ‘डेर गेस्ट इस्ट गॉट’ हे या नाटकाचे नाव आहे. बोरिस झाईड्लकर हा जर्मन मुलगा ‘स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्रॅम’अंतर्गत देशपांडे कुटुंबात राहायला येतो. तो राधा देशपांडे या मुलीच्या प्रेमात पडतो. त्यावरून उडालेला गदारोळ, त्यांची संस्कृती-आपली संस्कृती याचा ऊहापोह या नाटकात रंजक पद्धतीने मांडला आहे.
‘डू अँड मी’ नाटकाचा मराठी प्रयोग १७ मे २०१३ रोजी पुण्यात झाला होता. तर, २०१४ मध्ये या नाटकाचे बर्लिन आणि म्युनिच येथे प्रयोग सादर झाले. मार्च २०१४ मध्ये डेर गेस्ट इस्ट गॉट नाटकाचा पहिला प्रयोग बर्लिन येथे सादर झाला होता. या दोन्ही नाटकांचे प्रयोग त्या त्या देशात होत आहेत. ऑथर प्रोजेक्टचा अखेरचा टप्पा म्हणजे जर्मन नाटकाचा भारतातील प्रयोग. हा करण्यासाठी ग्रिप्सचा चमू जूनमध्ये पुण्यात दाखल होत आहे. २ आणि ३ जून रोजी जर्मन नाटकाचा तर, ४ जून रोजी मराठी नाटकाचा प्रयोग होत आहे, अशी माहिती शुभांगी दामले यांनी दिली.