पोलिसांकडून कारवाई; खरेदीसाठी आलेल्यांची गैरसोय

पुणे : राज्यातील किराणा माल विक्रीसह जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी अकरापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, याबाबतचे अंतिम आदेश लागू होण्यापूर्वी शहरातील किराणा माल विक्री दुकानांसह जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी सर्व दुकाने पोलिसांनी मंगळवारी सकाळी अकरानंतर बंद केली. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

राज्यात करोनाचा संसर्ग वाढत असून औषध विक्रीवगळता भाजीपाला, किराणा माल, दूध विक्रीची दुकाने सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय सोमवारी (१९ एप्रिल) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी पोलिसांनी मंगळवारपासून (२० एप्रिल) केली. दुकाने बंद करण्याबाबतचा आदेश महापालिका आयुक्तांकडून काढण्यात आला नसून आदेशापूर्वीच दुकाने बंद करण्यात आली.

काही भागातील किराणा माल दुकानदारांनी घाबरून दुकाने बंद केली. शहरातील मध्यभागात गस्त घालणाऱ्या पोलिसांनी दुकाने बंद करण्यास सांगितले. किराणा माल विक्रेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे, असे मध्यभागातील एका किराणा माल विक्रेत्याने सांगितले.

दुकानदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण

किराणा माल, दूध विक्रेते तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शहरात करोनाचा संसर्ग वाढत आहे. शनिवारी आणि रविवारी टाळेबंदी लागू असल्याने सर्व दुकाने बंद आहेत. अशा परिस्थितीत व्यापारी प्रतिनिधींची बाजू ऐकून घेण्याची गरज आहे. जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याची सुविधा व्यापारी देऊ शकतात. जेणेकरून नागरिक खरेदीसाठी बाहेर पडणार नाहीत. त्यासाठी समन्वय साधण्याची गरज आहे. करोनाचा संसर्गाला अटकाव घालण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात येईल, असे  पुणे जिल्हा रिटेलर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी सांगितले.

खरेदी करणार कधी?

शहरातील खासगी कार्यालये बंद असली, तरी अत्यावश्यक  सेवेतील कार्यालये सुरू आहेत. अनेक महिला कार्यालयीन कामकाजात व्यस्त असतात. यापूर्वी दुकानांची वेळ सायंकाळी सहापर्यंत ठेवण्यात आली होती. या काळात नागरिक खरेदी सोयीनुसार खरेदी करू शकत होते. मात्र, सकाळी अकरानंतर दुकाने बंद करण्याच्या आदेशामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. शनिवार आणि रविवार टाळेबंदी असल्याने दुकाने दोन दिवस बंद राहणार आहेत. सकाळी फक्त चार तास दुकाने सुरू ठेवण्याच्या निर्णयामुळे सामान्यांना त्रास होणार आहे. दुकानात गर्दी वाढण्याची शक्यता आहे. दिवसभर दुकाने सुरू ठेवल्यास नागरिक त्यांच्या सोयीनुसार खरेदी करू शकतात, असे विचार  नागरिकांनी मांडले.