ग्राहकांवर जीएसटीपूर्वसवलतींचा पाऊस

जीएसटी लागू झाल्यानंतर नेमक्या कोणत्या घटकांचे दर वाढणार या संभ्रमात असलेल्या ग्राहकांनी अगदी पाकिटबंद खाद्यपदार्थापासून ते कपडे, विद्युत उपकरणे, सोने यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत शुक्रवारी गर्दी केली होती.

जीएसटी लागू झाल्यानंतर विद्युत उपकरणे, मोबाईल संच, सोने यांच्या किमती काही अंशी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. पावसाळा हा बाजारपेठेसाठी एरवी शांत असतो. मात्र सणासुदीच्या काळात व्हावी अशी गर्दी खरेदीसाठी बाजारपेठेत दिसून येत होती. टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल्स, फ्रिज, वॉशिंग मशिन, मायक्रोवेव्ह यांची विक्री चार दिवस मोठय़ा प्रमाणात झाली. पावसाळा असूनही एसीची खरेदीही होत असल्याचे निरीक्षण विक्रेत्यांकडून नोंदवण्यात आले. या सर्वाच्या तुलनेत वाहनांच्या खरेदीकडे कल कमी असला, तरी त्यासाठीही नेहमीपेक्षा अधिक नोंदणी होत असल्याचे सांगण्यात आले. कपडे आणि खाद्य पदार्थाच्या खरेदीसाठीही गर्दी होती. काही मॉल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. सध्या उपलब्ध असलेल्या मालाच्या खरेदीत सवलती देऊन त्यांची विक्री सुरू होती.

या सगळ्याबरोबरच सराफबाजारही ग्राहकांनी ओसंडून वाहात होता. दिवळी, दसरा किंवा लग्नसराईच्या दरम्यान सराफांच्या दुकानात दिसणारी गर्दी शुक्रवारी दिसून आली. ‘कर वाचवण्याचा शेवटचा आठवडा..’ अशा आशयाच्या जाहिराती काही दागिन्यांच्या काही ब्रँड्सनी केल्या होत्या. ‘एरवी पावसाळ्यात फारशी गर्दी नसते. मात्र मंगळवारपासून दुकानात नेहमीपेक्षा खूपच गर्दी झाली होती,’ असे पु.ना.गाडगीळ अँड सन्सचे अजित गाडगीळ यांनी सांगितले.

सवलतींचा वर्षांव

ग्राहकांच्या भीतीमिश्रित उत्साहाला विक्रेत्यांनी सवलती आणि योजनांची जोड दिली होती. ‘जीएसटीपूर्व खरेदी योजना’ ‘प्री जीएसटी सेल’ची जाहिरातबाजी विक्रेत्यांकडून करण्यात येत होती. काहीं विक्रेत्यांनी दरवर्षीच होणाऱ्या ‘मान्सून सेल’ ला यंदा जीएसटीचा मुलामा चढवला होता. मॉल्समध्येही ग्राहकांसाठी सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. अगदी पन्नास ते साठ टक्क्य़ांपर्यंतच्या सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. यांत ऑनलाईन बाजारपेठेने आघाडी घेतली होती. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील या आघाडीच्या संकेतस्थळावर विद्युत उपकरणे, मोबाईल्स, ब्रँडेड कपडे, घडय़ाळे, पफ्र्युम्स यांच्यावर मोठी सूट होती. मोबाईल वॉलेटमध्ये आघाडीवर असलेल्या पेटीएम या कंपनीच्या ‘पेटीएम मॉल’ या अ‍ॅपवरही प्री-जीएसटी सेल लागू करण्यात आला होता. याबाबत अ‍ॅमेझॉनच्या माधवी कोचर यांनी सांगितले, ‘अ‍ॅमेझॉनकडून काही सवलत योजना जाहीर करण्यात आली नव्हती. मात्र उत्पादकांनी त्यांच्या तयार मालाच्या विक्रीसाठी अनेक सवलती लागू केल्या होत्या.’

विमानप्रवास, हॉटेल बुकिंगवरही सवलती

जीएसटीनंतर विमानप्रवास, हॉटेलातील राहणेही महागणार आहे. विमान कंपन्यांनी ‘जीएसटीपूर्व’ सवलत अशी जाहिरातबाजी केली नसली तरी मोठय़ा प्रमाणावर सवलती देण्यात आल्या होत्या.  अगदी सहाशे रुपयांपासून विमान प्रवास अशा आकर्षक भासणाऱ्या योजना कंपन्यांनी जाहीर केल्या होत्या. सहलींचे नियोजन करून देणाऱ्या, हॉटेलमधील नोंदणी करून देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांनीही शुक्रवार रात्रीपर्यंत नोंदणी करणाऱ्यांसाठी सवलती जाहीर केल्या होत्या.