नाटकाच्या तिकीट दरामध्ये वाढ होणार

नृत्याचे कार्यक्रम वगळता शास्त्रीय संगीताच्या मैफली आणि विविध महोत्सवांना वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) फटका बसला आहे. नाटकाच्या तिकीट दरामध्ये वाढ होणार असून चित्रपटाच्या तिकीट दरावर सध्या तरी परिणाम होण्याची शक्यता नाही.  देशाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील रसिकांना आता अभिजात मनोरंजनासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. पुण्यामध्ये या आठवडय़ात जे नाटय़प्रयोग होणार आहेत त्याचे तिकीट दर सरसकट अडीचशे रुपये ठेवून सध्या या प्रश्नावर मार्ग काढण्यात आला आहे.

शनिवारपासून (१ जुलै) जीएसटी लागू होत आहे. त्याचा थेट परिणाम नाटक, चित्रपट आणि शास्त्रीय संगीताच्या मैफलींवर होत आहे. शास्त्रीय संगीताच्या मैफली आणि महोत्सवांसाठी अडीचशे रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या तिकीट दरावर २८ टक्के जीएसटी लागू होणार आहे, तर नाटकासाठी १८ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. त्यामुळे अडीचशे रुपयांवरील तिकीट दरासाठी नाटय़प्रेमींना आता जीएसटीमुळे अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.

शास्त्रीय संगीताच्या मैफलींसाठी तिकीट दरावर २८ टक्के जीएसटी लागू करण्याचा फटका शहरामध्ये होणाऱ्या विविध महोत्सवांना बसणार आहे. कोणत्याही शास्त्रीय संगीताच्या मैफलीसाठी किमान पाचशे रुपये तिकीट दर असतो. मात्र, आता अडीचशे रुपयांपर्यंत तिकीट दर असेल तर त्याला जीएसटी लागू होत नाही. मात्र, त्यावरील तिकिटाच्या दराला २८ टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. शास्त्रीय संगीताच्या महोत्सवासाठी हे थोडे अडचणीचे ठरेल, असे मत सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आयोजक असलेल्या आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी व्यक्त केले.

नाटकाचा तिकीट दर अडीचशे रुपयांहून अधिक असेल तर, त्यावरील प्रत्येक रुपयाला १८ टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये नाटकाला करमणूक कर माफ होता. आता १८ टक्के जीएसटी लागू केल्यामुळे नाटय़निर्माते हवालदिल झाले आहेत. नाटय़निर्माता संघाने नाटकाच्या तिकीट दरावर कर आकारण्याची मर्यादा २५० रुपयांवरून ५०० रुपये करावी, अशी मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली असल्याची माहिती मनोरंजन नाटय़संस्थेचे मोहन कुलकर्णी यांनी दिली. या आठवडय़ात नाटकाचे तिकीट दर सरसकट अडीचशे रुपये करून तात्पुरता मार्ग काढला असल्याचो त्यांनी सांगितले. मुक्ता बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘कोडमंत्र’ या नाटकाचा ४ जुलै रोजी प्रयोग होत असून त्यासाठी अडीचशे रुपये तिकीट दर आकारण्यात आला आहे, असे नाटय़व्यवस्थापक समीर हंपी यांनी सांगितले.

चित्रपटाच्या तिकीट दरावर परिणाम

चित्रपटासाठी शंभर रुपयांहून अधिक रकमेचे तिकीट असेल तर १८ टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे. मात्र, एकपडदा चित्रपटगृह असो किंवा मल्टिप्लेक्स येथे चित्रपट पाहण्यासाठी तिकीट दरावर सध्या तरी जीएसटीमुळे कोणताही परिणाम होणार नाही. एकपडदा चित्रपटगृहाचे तिकीट दर हे शंभर रुपयांपेक्षा कमी आहेत. त्यातील ४० टक्के करमणूक कर आणि ६ टक्के सेवा कर म्हणून सरकारला भरला जात असे. मराठी चित्रपट करमुक्त असल्याने प्रेक्षकांना तिकीट दरामध्ये किमान २० रुपये सवलत मिळत होती. मात्र, जीएसटी हा केंद्र सरकारचा कर असल्याने शनिवारपासून (१ जुलैपासून) मराठी चित्रपटालाही जीएसटी लागू होणार आहे, अशी माहिती विजय चित्रपटगृहाचे दिलीप निकम यांनी दिली. मल्टिप्लेक्स चित्रपटगृहामध्ये शंभर रुपयांपर्यंतच्या तिकीट दराला १८ टक्के तर, शंभर रुपयांहून अधिक रकमेच्या तिकीट दराला २८ टक्के जीएसटी लागू झाला आहे. राज्य सरकारने मल्टिप्लेक्सचा करमणूक कर रद्द केला असला, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांना जीएसटी व्यतिरिक्त करमणूक कर लावण्याची मुभा दिली असल्याने मल्टिप्लेक्सवरील टांगती तलवार कायम आहे, अशी माहिती सिटी प्राइडचे प्रकाश चाफळकर यांनी दिली.