सराफ सुवर्णकारांनी सुरू केलेल्या बेमुदत बंदमुळे गुढीपाडवा आणि सोन्याची खरेदी असे वर्षांनुवर्षांचे समीकरण ग्राहकांसाठी शुक्रवारी जुळू शकले नाही. साडेतीन मुहूर्तातील एक असलेल्या गुढीपाडव्याला सराफ बाजारात फार मोठय़ा प्रमाणात सोने व सोन्याच्या दागिन्यांची खरेदी होते. यंदा मात्र ग्राहकांना मुहूर्तावरील सोनेखरेदीचा आनंद घेता आला नाही.
गुढीपाडव्याला सोन्याचे दागिने किंवा सोन्याची वळी खरेदी करण्यासाठी सराफ बाजारात मोठी गर्दी होते. त्यासाठी सराफ आणि सुवर्णकारांकडूनही गुढीपाडव्याच्या आधीपासूनच तयारी केली जाते. सोन्याची वळी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पुण्यात अनेक सराफांकडून गुढीपाडव्याच्या दिवशी केवळ सोन्याच्या वळ्यांची विक्री करण्यासाठी वेगळी दालने उघडली जातात. यंदा मात्र सराफ बाजारात पाडव्यालाही शांतता होती. त्यामुळे पाडव्याच्या दिवशी सोनेखरेदीचा आनंद ग्राहकांना मिळाला नाही.
केंद्र सरकारने एक टक्का अबकारी कर रद्द करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनने बंद पुकारला असून जोपर्यंत हा कर रद्द केला जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय संघटनेने जाहीर केला आहे. त्यानुसार सराफ, सुवर्णकारांची पुणे व पिंपरीसह सर्व भागातील दुकाने शुक्रवारीही बंदच राहिली. सराफांच्या आंदोलनाचा भाग म्हणून पिंपरीतील सराफांनी शुक्रवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन पिंपरीचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि सराफ सुवर्णकार फेडरेशनच्या मागणीला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच या प्रश्नावर शासनाशी चर्चा करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. पिंपरी-चिंचवड सराफ असोसिएशनतर्फे आयोजिण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्वही खासदार बारणे यांनी केले.