पुणे : करोना संसर्गावर उपचार करताना प्राणवायूचा वापर, स्टिरॉईड औषधे आणि उपजत असलेला मधुमेह अशी एकत्रित पार्श्वभूमी असलेल्या रुग्णांना घरी सोडण्यापूर्वी त्यांची संपूर्ण तपासणी करण्याच्या सूचना राज्याचे तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी दिल्या आहेत. म्युकोरमायकोसिस रुग्णांची वाढती संख्या पाहता लवकर निदान आणि उपचारांसाठी रुग्णालयांना या सूचना देण्यात आल्या आहेत.

करोना संसर्गासह मधुमेह, कर्क रोग, एचआयव्ही अशा विविध आजारांनी ग्रासलेल्या, त्यावर उपचारांसाठी स्टिरॉईड औषधे घेणाऱ्या आणि रोग प्रतिकारशक्ती अत्यंत कमी झालेल्या रुग्णांमध्ये या आजाराचा धोका अधिक आहे. त्याचबरोबर अशा रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाणही ५० टक्के  आहे. त्यामुळे रुग्णालयातून घरी सोडण्यापूर्वीच करोनामुक्त रुग्णांच्या सर्व तपासण्या कराव्या, तसेच आजाराची लक्षणे आणि त्याचे स्वरुप याबाबत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना स्पष्ट कल्पना देण्यात यावी असेही डॉ. साळुंखे यांनी स्पष्ट केले आहे.

डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले, राज्यात म्युकोरमायकोसिसचा धोका वाढत आहे. योग्य वेळी आजाराचे निदान झाले तर रुग्णांचा मृत्यू होण्याचा धोका टाळणे शक्य आहे. करोनातून बरे झाल्यानंतर साधारण एक महिन्यापर्यंत म्युकोरमायकोसिसचा संसर्ग होण्याचा धोका असतो. मूत्रपिंड आणि यकृताचे जुने दीर्घकालीन आजार, कर्क रोग, एचआयव्ही आणि इतर गंभीर सहव्याधी असल्यास अशा रुग्णांनी सतर्क  राहणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर घरी सोडण्यापूर्वीच तपासण्या करणे योग्य ठरेल. तसेच, रुग्णाच्या वर्तनात नेहमीपेक्षा विपरित बाबी दिसल्यासही कुटुंबीयांनी त्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही डॉ. साळुंखे यांनी के ले आहे.